चिपळूण : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत चिपळूण गटात मिशन बंधारे उपक्रमांतर्गत ‘एक दिवस बंधाऱ्यासाठी’ ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून तालुक्यात 500 बंधारे बांधण्याचा संकल्प होता. त्यानुसार विजय बंधारे 140, वनराई 41 व कच्चे 346 असे एकूण 527 बंधारे उभारण्यात आले.
या मोहिमेमुळे तालुक्यात आजअखेर विजय 272, वनराई 73 व कच्चे 434 असे एकूण 778 बंधारे पूर्ण झाले असून, पाणी अडवणे व भूजल पातळी वाढवणे या दिशेने मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. यातून लाखो लिटर पाणी जमिनीत जिरणार आहे.
जि. प. गटात प्रभावीपणे जलसंधारणाची कामे अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यासाठी सविस्तर नियोजन करण्यात आले असून, मिशन बंधारे अंतर्गत एकूण 1000 बंधारे उभारण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) व प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) सागर पाटील तसेच कृषी विकास अधिकारी अभिजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
तालुक्यातील 130 ग्रा.पं.मध्ये प्रतिग्रामपंचायत किमान 10 बंधारे या उद्दिष्टाने तालुकास्तरावर मोहीम आखली होती. गटविकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील 9 जि. प. गटांसाठी 9 विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली.