

रत्नागिरी: कोकणच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपला बालेकिल्ला अभेद्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. शिवसेना-भाजप महायुतीने ठाकरेंच्या शिवसेनेला (उबाठा) जोरदार धक्का देत २९-३ अशा मोठ्या फरकाने एकतर्फी विजय मिळवला आहे. या विजयामुळे रत्नागिरी शहरावर पुन्हा विजयाचा झेंडा फडकवत सामंत यांनी विरोधकांना चारी मुंड्या चित केले आहे
अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली होती. मतमोजणीच्या शेवटी त्यांनी विक्रमी मताधिक्य मिळवत विजय संपादन केला. त्यांच्या या विजयाने शहराच्या विकासकामांवर जनतेने मोहोर उमटवल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीची 'एकतर्फी' घोडदौड या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या युतीने विरोधकांचे सर्व मनसुबे उधळून लावले. एकूण जागांपैकी तब्बल २९ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ६ उमेदवारांनी विजय मिळवला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी आणि विशेषतः ठाकरे गटाला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले.
पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई होती. त्यांनी स्वतः मैदानात उतरून रणनीती आखली होती. ठाकरे गटाने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती, मात्र सामंत यांच्या झंझावातापुढे त्यांचा निभाव लागला नाही. सामंत यांनी गेल्या काही वर्षांत रत्नागिरीत राबवलेल्या विकासकामांची ही पावती असल्याचे मानले जात आहे. या विजयानंतर रत्नागिरी शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा जल्लोष साजरा केला.