रत्नागिरी

रत्नागिरी : चिपळूण रेल्वेस्थानक सुशोभीकरणाच्या ‘टॅ्रक’वर!

पुढारी वृत्तसेवा
सुनील दाभोळे

चिपळूण शहर : राज्याचे बांधकाममंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून कोकण रेल्वे मार्गावरील जिल्ह्यातील स्थानकांचा कायापालट होत आहे. त्याला कोकण रेल्वे मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. चिपळूण रेल्वेस्थानक आणि त्याच्या आजूबाजूचा विस्तीर्ण परिसर लक्षात घेता या स्थानकाचे रूप आता हळूहळू हेरिटेज रेल्वे स्थानक म्हणून उल्लेखले जाणार आहे. स्थानकाच्या महामार्गाकडील मुख्य प्रवशेद्वाराला विस्तीर्ण असे मोकळे मैदान लाभले आहे. त्याच जागेवर आता चिपळूण अर्थातच कोकणातील निसर्गसंपदा आणि तेथील राहणीमान असलेले जनजीवनाचे दर्शन सुशोभीकरण अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या विविध शिल्पांच्या माध्यमातून दिसून येत आहे.

सुमारे तीस वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर जोशी यांच्या हस्ते चिपळूण रेल्वे स्थानकाचे लोकार्पण झाले. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी, कोकणातील रायगड जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री पै. बॅ. अंतुले, तत्कालीन खासदार स्व. गोविंदराव निकम, आ. भास्कर जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीत महामार्गावरील वालोपे येथील चिपळूण रेल्वे स्थानकाचा लोकार्पण सोहळा झाला. तीस वर्षांचा लोटलेल्या कालावधीचा विचार करता चिपळूण (वालोपे) रेल्वे स्थानक हळूहळू आधुनिक व सुशोभीकरणाकडे वेगाने वाटचाल करीत आहे.

वन्यप्राणी, जलचर, कोकणी संस्कृतीमध्ये असलेली दुभती जनावरे आदींची शिल्प (स्टॅच्यू) प्रवेशद्वाराच्या भव्य प्रांगणातच फुलझाडांनी सुशोभित व स्थानिक वृक्षराजींनी असलेल्या बगिच्यामध्ये उभारण्यात आली आहेत. संपूर्ण सुशोभीकरणासाठी जांभा दगडाचा अत्यंत रेखीव, आकर्षक धाटणीच्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे तर प्रवासी मार्गावर तसेच स्थानक परिसराभोवती असलेल्या भिंतीवर कोकणी संस्कृतीची ओळख सांगणारी भित्तीचित्रे रंगविण्यात आली आहेत. स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या एका बाजूला भव्य अशी मजबूत शेड उभी करून वाहन तळ तर दुसर्‍या बाजूला तशाच पद्धतीचा तळ उभारण्यात आला आहे.

दरम्यान, कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री स्व. प्रा. मधु दंडवते यांचे चिपळूण हे माहेर असल्यासारखे नाते होते. त्यामुळे चिपळूण स्थानकाला त्यांचे नाव मिळावे अशी मागणी वारंवार होत आहे. मात्र, या थोर व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच त्यांचे छायाचित्र नुकतेच लावून त्यांचा सन्मान करण्यात आला.

गांधारेश्वर भागातही तिकीट घर

बांधकाममंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचा पाया उभा राहात आहे. लवकरच शहरातील गांधारेश्वर वाशिष्ठी नदी भागाकडील रेल्वेच्या जागेत प्रवाशांसाठी तिकीट घर सुरू केले जाणार आहे. याचा फायदा मोठ्या प्रमाणात प्रवाशांना होणार आहे. कारण मुख्य प्रवेशद्वारावर तिकीट घर असल्याने पलिकडच्या बाजूने प्रवाशांना कसरत करीत मुख्य प्रवेशद्वारावर धावत यावे लागते. ही बाब लक्षात घेता कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी अनेक वर्षे पाठपुरावा करून प्रवाशांच्या या महत्त्वाच्या सुविधेसाठी प्रयत्न केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT