चिपळूण नगर परिषद (Pudhari File Photo)
रत्नागिरी

Umesh Sakpal : रस्ता रुंदीकरणाचे नियोजन हाती घ्या

चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची प्रशासनाला सूचना; वाहतूक कोंडी सुटणार

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण शहर : वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांच्या जाळ्यात अडकलेले शहरातील प्रमुख रस्ते विकास आराखड्याच्या नोंदीप्रमाणे रुंद करण्यासाठी प्रशासनाने नियोजन हाती घ्यावे, अशा सूचना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिल्या असून गेली अनेक वर्षे रूंदीकरणाअभावी रखडलेले प्रमुख वर्दळीचे रस्ते आता रूंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहरातील विकासकामे व पायाभूत सुविधांच्या दृष्टीने नगराध्यक्ष सकपाळ यांनी दोन-तीन दिवसांपासून प्रमुख ठिकाणांची पाहणी करीत त्या-त्या परिस्थितीचे अवलोकन करून स्वच्छता, सुधारणा व विकास आराखड्यातील नियोजनाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत पाऊले उलचण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील मुख्य मार्ग असलेला बाजारपेठ ते बाजारपेठ प्रामुख्याने छत्रपती शिवाजी चौक ते बहादूरशेख तसेच छत्रपती शिवाजी चौक ते स्वा. सावरकर चौक (पॉवर हाऊस) या प्रमुख मार्गांचे विकास आराखड्यातील रूंदीकरणाच्या नोंदीनुसार नियोजन करण्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला रस्ते रूंदीकरणाबाबत आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. या रस्त्याबरोबरच रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरण व उंची वाढविणे, सांडपाण्याचा निचरा आदी पायाभूत व्यवस्थांचा आढावा घेतला. एकूणच प्रदीर्घ कालावधीनंतर शहरातील महत्त्वाचे रस्त्यांचे रूंदीकरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्ते रूंदीकरणासाठी आमदार शेखर निकम यांनी यापूर्वीच शासनकडून आवश्यक निधीची तरतूद करून दिली आहे. रस्ते मजबूत व्हावेत यासाठी नगराध्यक्ष सकपाळ यांच्या मागणीनुसार पालकमंत्री ना. उदय सामंत देखील आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन मिळाले आहे.

रामतीर्थ व्ह्यू पॉईंट गजबजणार...

दहा वर्षांपूर्वी माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांच्या कारकिर्दीत शहरातील रामतीर्थ तलाव परिसरात कोट्यवधी रूपये खर्च करून शहराचा व्ह्यू पॉईंट उभारण्यात आला व त्याच ठिक़ाणी बगिच्यासहीत इमारती उभ्या करण्यात आल्या. मात्र, उद्घाटनानंतर हा परिसर वापराविना दुर्लक्षितच राहिला. परिणामी, संपूर्ण पर्यटन केंद्र जंगली झुडपांच्या आड लुप्त झाले. दरम्यान, सकपाळ यांनी या ठिकाणी पाहणी करून तातडीने या ठिकाणी स्वच्छता राबवून महाराष्ट्र हायस्कूल ते स्वामी मठ रस्त्यावर खाद्य विक्रेत्यांसाठी दिलेली पर्यायी जागा बदलून आता या पर्यटन केंद्रातील इमारतीत संबंधित खाद्यपदार्थ विक्रीसाठी जागा उपलब्ध करून चौपाटी व खाऊ गल्लीला पर्यायी व्यवस्था केली आहे. परिणामी, या मार्गावर सायंकाळनंतर होणारी गर्दी व वाहतुकीला होणारा अडथळा कमी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT