समीर जाधव
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच शिवसेना-भाजप युतीला एकहाती सत्ता मिळाली आहे. अनेकवेळा शिवसेना-भाजप युतीने चिपळूणमध्ये भगवा फडकविण्याचा चंग बांधला. मात्र, आजवर ते शक्य झाले नव्हते. मूळ शिवसेनेच्या विभाजनानंतर ही किमया करण्यात माजी आमदार सदानंद चव्हाण आणि भाजपचे नेते प्रशांत यादव यांना यश मिळाले आहे. त्यामुळे अनेक वर्षानंतर चिपळूण न.प.वर युतीचा भगवा फडकला आहे. त्यामुळे आगामी काळात चिपळूणच्या विकासाला कशी चालना देणार हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ विकासाचा अजेंडा कसा राबवितात हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
नगराध्यक्षपदाची माळ उमेश सकपाळ यांच्या गळ्यात पडल्यानंतर रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष कै. उमेश शेट्ये यांची आठवण आली. त्यांनी रत्नागिरीच्या विकासाला चालना देणारे नियोजन केले व तेथील रस्त्यांचे दुपदरीकरण करून रत्नागिरीमध्ये विकासाची गंगा आणली. आज रत्नागिरीत जो विकास झाला त्याचा पाया कै. उमेश शेट्ये यांनी रचला. त्यामुळे चिपळूण विकासाचा पाया नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ हे घालून देतील, अशी अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. गेल्या गेल्या 20 वर्षांत चिपळूणचा विकास तसा ठप्पच झालेला आहे. अलिकडच्या एक-दीडवर्षात आ. शेखर निकम यांनी चिपळूणसाठी भरीव निधी दिला. सुमारे साडेतीनशे कोटीहून अधिक निधीतून विकासाची कामे सुरू आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे, ग्रॅव्हिटीची पाणी योजना मार्गी लागत आहे. शहरात कोट्यवधीचा निधी देऊनदेखील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अवघ्या दोन जागा विजयी झाल्या. त्यामध्ये महायुतीमधील असमन्वय आणि आयत्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एकाकी पडल्याने केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. जर महायुती म्हणून ही निवडणूक एकत्रित लढली गेली असती तर कदाचित चिपळुणात महाविकास आघाडीला ‘व्हाईट वॉश’देखील मिळाला असता. ही संधी मात्र महायुतीमधील घटक पक्षांनी घालवली आणि त्यांना 16 जागांवर समाधान मानावे लागले.
चिपळूण न.प.मध्ये सत्ताबल पाहिल्यास शिंदे शिवसेना 9, भाजपा 7 आणि महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार राष्ट्रवादीचे 2 व नगराध्यक्ष 1 असे 19 संख्याबळ झाले आहे तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणारा ठाकरे शिवसेना प्रमुख पक्ष बनला असून त्यांचे 5, काँग्रेसचे 3 आणि शरद पवार राष्ट्रवादीचे 2 असे 10 सदस्य झाले आहेत. त्यामुळे विरोधी गटनेता हा ठाकरे शिवसेनेचा होईल हे स्पष्ट आहे. चिपळूण न.प.तील मागील सत्ताधाऱ्यांचे पक्षीय बलाबल लक्षात घेतल्यास यावेळी भाजपने अधिक जागा जिंकल्या आहेत. गतवेळी भाजपचे 5 नगरसेवक होते, आता ही संख्या 7 झाली आहे. तर काँग्रेसचे नगरसेवक घटले असून 5 वरून 3 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत; परंतु यावेळी काँग्रेस स्वबळावर लढत असताना देखील राष्ट्रवादीपेक्षा अधिक जागा मिळविण्यात काँग्रेसला यश आले. चिपळूणची निवडणूक महाविकास आघाडी विरूद्ध महायुती होईल असे वाटत असतानाच त्यात अनेक रंग भरले गेले. महायुतीमधून अजित पवार राष्ट्रवादी बाहेर राहिली. त्याचा परिणाम महायुतीच्या जागा कमी होण्यावर झाला आहेच, मात्र त्याचे आत्मपरीक्षण होणे जरूरीचे आहे. शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण आणि भाजपा नेते प्रशांत यादव यांनी नवीन राजकीय समिकरण जुळवून आणले आहे. मात्र, त्यामध्ये महायुतीच्या घटक पक्षाचे विद्यमान आमदार शेखर निकम यांना बाजूला ठेवल्याने महायुतीमधील नगरसेवकांची संख्या घटली हे नाकारता येणार नाही. काही नगरसेवकांच्या मतांचा फरक लक्षात घेता हे स्पष्ट होते.
दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी एकजीव असती तर चिपळूणची निवडणूक अधिक अटीतटीची झाली असती. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम हे तगडे उमेदवार होतेच. त्यांच्यासमोर उमेश सकपाळ यांनी दिलेली लढत महत्त्वपूर्ण आहे. मात्र, आघाडीतील बेबनाव या निवडणुकीत उघड झाला. सुरुवातीपासूनच आघाडीतून काँग्रेसला तसेच ठाकरे शिवसेनेला डावलण्यात आले. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कदम यांनी सुरुवातीपासूनच आपणच प्रबळ दावेदार आणि आपल्यालाच मतदार साथ देणार असा आत्मघातकी विश्वास दाखविला आणि तो अंगलटही आला. दुसऱ्या बाजूला ठाकरे शिवसेना स्वबळावर लढली तर शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांनी स्वतंत्र चूल मांडून आपल्या उमेदवारांचा प्रचार केला. अनेकवेळा आ. जाधव यांनी चिपळूणवर वर्चस्वाचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे ना. सामंत म्हणाले.