चिपळूण : नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक रंगतदार अवस्थेत आली आहे. नगराध्यक्षपदासाठी 7 तर नगरसेवकपदासाठी तब्बल 110 उमेदवार रिगणात असल्याने कोण-कोणाच्या विरोधात आणि कोण कोणाच्या बाजूने यावरून मतदारच संभ्रमात आहेत. प्रभागा-प्रभागात उमेदवार आपली प्रचार पत्रके वितरित करीत असून जोरदार प्रचार यंत्रणा राबवत आहेत. निवडून आल्यानंतर पाच वर्ष हा जाहीरनामा किंवा वचननामा किती पाळला जाणार याबाबत नागरिक आता उमेदवारांना देखील सवाल करीत आहेत.
नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांनी जाहीरनामे, वचननामा प्रसिद्ध केले आहे. आणि मतदारांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही निवडणूक महायुती किंवा महाविकास आघाडी अशी लढवली जात नसल्याने विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते गटा-तटात विभागाले गेले आहेत.
नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांकडून वचननाम्यांच्या माध्यमातून आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे. नगराध्यक्षपदाच्या रिंगणात असलेल्या एका उमेदवाराने विकासासाठीच राजकारण हे ब्रिदवाक्य घेऊन चिपळूणच्या सर्वांगीण विकासाचा संकल्पनामा मांडला आहे. यामध्ये खड्डेमुक्त चिपळूण, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण,? ?
आधुनिक स्ट्रीट लाईट, अद्ययावत प्रकाश योजना, नगरपालिकेची मुख्य इमारत व अन्य सार्वजनिक इमारतींवर सोलर सिस्टीम, लाल व निळी पूररेषा, नगरपालिकेच्या दवाखान्याचा विकास, भुयारी गटार योजना, शिवनदी नवीन पूल, 24 तास पाणी, महिलांसाठी क्रींडागण, इटीपी प्लान्ट, पालिकेचे उत्पन्न वाढवणे, आधुनिक भाजीमंडई, स्वच्छ व सुदंर शहर, विद्यार्थ्यासाठी स्टडी सेंटर, शहर विकास हद्दवाढ करणे, भटक्या कुत्र्यांचे नियंत्रण, तळ्यांचे सुशोभीकरण, शहरासाठी लघु धरण प्रकल्प, शहरात खाऊगल्ली, तसेच घरोघरी लाईनद्वारे गॅसपुरवठा असे अनेक संकल्प करण्यात आले आहेत.
दुसर्या एका उमेदवाराकडून माझे घर म्हणजेच चिपळूण हे ब्रिदवाक्य घेऊन प्रचार सुरू आहे. चिपळूणच्या भविष्यासाठी लोकाभिमुख व गुणवत्तापूर्ण विकास, गतीमान व पारदर्शक कारभाराचे आश्वासन देत विकासात्मक मुद्दे टाळून केवळ भावनिक साद घातली आहे.
नगराध्यक्षपदाच्या एका अपक्ष उमेदवाराने पुढील पाच वर्षाचा वचननामाच सादर केला. स्वच्छ व सुंदर शहर, रस्त्यांचे रूंदीकरण करून दुतर्फा फूटपाथ व दुभाजक, पुरमुक्त चिपळूण आदी बाबींचा वचननाम्यात समावेश केला आहे.
जाहीरनाम्यात तेच विषय... आणि तोच वचननामा..!
निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक उमेदवार आपला जाहीरनामा, वचननामा किंवा संकल्पनामा प्रसिद्ध करीत असतो. या माध्यमातून पाच वर्षांत हे करणार.. ते करणार... असे सांगितले जाते. मात्र, मतदार पुढची निवडणूक येईपर्यंत हा जाहीरनामा विसरतो आणि वर्षानुवर्ष प्रत्येक जाहीरनाम्यात तेच-तेच विषय येत असतात, हा प्रत्यय सध्या चिपळुणात येत आहे.