चिपळूण येथील बहुचर्चित उड्डाण पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 
रत्नागिरी

Chiplun flyover opening new year |नववर्षाच्या स्वागताला चिपळूणचा उड्डाण पूल खुला होणार

नोव्हेंबरअखेर डांबरीकरण, भरावाचे काम होणार पूर्ण; उर्वरित काम डिसेंबरअखेर, जोडरस्त्याचे काम युद्धपातळीवर

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणचा उड्डाण पूल थर्टी फर्स्ट डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे यावर्षी थर्टी फर्स्ट किंवा नवीन वर्षाच्या स्वागताला येणारा कोकण किंवा गोव्याकडे जाणारा पर्यटक याच उड्डाण पुलावरून मार्गस्थ होणार आहे. या उड्डाण पुलाच्या भरावाचे काम युद्धपातळीवर सुरू असून दिवस-रात्र काम करण्यात येत आहे. त्यामुळे नोव्हेंबरअखेर डांबरीकरण व भरावाचे काम पूर्ण होणार असून उर्वरित कामे डिसेंबरमध्ये केली जाणार आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्ततेसाठी तब्बल १७ वर्षांचा कालावधी लोटला तरी काम पूर्ण झालेले नाही. गणेशोत्सवापूर्वी चिपळुणातील उड्डाण पूल वाहतुकीस खुला करण्यासाठी जोरदार प्रयत्न झाला. पावसामुळे हा प्रयत्न निष्फळ ठरला; मात्र आता संपूर्ण काम पूर्ण करून चिपळूणचा उड्डाण पूल नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होणार आहे.

चिपळुणातील निर्माणाधीन उड्डाण पूल बहादूरशेख चौक येथे कोसळला. यानंतर पुलाचे डिझाईन बदलण्यात आले. आता या पुलाचे काम पूर्ण झाले असून केवळ डांबरीकरण आणि जोडरस्त्याचा भराव शिल्लक आहे. मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाण पुलावरील डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या ८ ते १० दिवसांत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भागाचे डांबरीकरण होणार आहे. हे डांबरीकरण झाल्यानंतर मास्टीक लेयर देण्यात येणार आहे. १.८७ किलोमीटरचा हा मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात्र मोठा उड्डाण पूल असून सध्या पुलास जोडणाऱ्या ३०० मीटर व १५० मीटर जोडरस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

अतिथी हॉटेल ते प्रांत कार्यालयादरम्यान भरावाचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या चार दिवसांत या ठिकाणच्या डेस्क स्लॅबचे काम सुरू होणार आहे. दुसऱ्या बाजूला डांबरीकरणाचे काम सुरू असून पुलावर ११३ पथदीप बसविण्यात आले आहेत. डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर रंगरंगोटी केली जाणार आहे व थर्टी फर्स्टपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात येणार असून यावर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणारे पर्यटक याच उड्डाण पुलावरून रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्याकडे जाणार आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर ८० कि.मी. प्रतितास वेगमर्यादा

मुंबई-गोवा महामार्गाचा डीपीआर लक्षात घेता कोकणातील हा चौपदरीकरणाचा रस्ता वळणावळणाचा आणि चढ-उतारांचा आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाने या रस्त्यावर वाहनांची वेग मर्यादा ८० कि.मी. प्रति तास इतकी ठेवलेली आहे. मात्र, अनेक वाहनचालक ही वेगमर्यादा ओलांडून मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने प्रवास करतात.

अनेकवेळा घाट उतारावर इंजिन बंद करून गाड्या चालविण्याचा प्रयत्न होतो. यामुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी कमीत-कमी ५० ते ६० व जास्तीत-जास्त ८० कि.मी. प्रति तास या वेगाने प्रवास करावा, म्हणजे आपला प्रवास सुरक्षित होईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाने सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT