चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सुमारे 65 टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र, दुपारच्या वेळेत अत्यल्प मतदार बाहेर पडले. सायंकाळी मतदान मोठ्या प्रमाणात होईल,असे वाटले असताना निवडणूक निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार हे कळल्याने मतदारांसह उमेदवारांमध्ये निरूत्साह दिसून आला.
चिपळूण शहरात एकूण 42 हजार 583 मतदार आहेत. यामध्ये 20 हजार 986 पुरुष तर 21 हजार 596 महिला मतदार आहेत. सकाळी 7.30 ते दुपारी 3.30 वा. पर्यंत 48 मतदान केंद्रांवर 51.26 टक्के मतदान झाले. यामध्ये 10 हजार 778 पुरुष तर 11 हजार 550 महिला अशा एकूण 21 हजार 828 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
चिपळूण न.प. निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार तर 28 नगरसेवक पदासाठी तब्बल 110 उमेदवार रिंगणात आहेत. शहरात किरकोळ ठिकाणी वादाचे प्रसंग सोडल्यास शांततेत मतदान झाले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे व पोलिस कर्मचार्यांनी शहरात गस्त घालून शांतता व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला.
अनेक ठिकाणी पोलिस कर्मचार्यांनी दिव्यांग मतदारांना मतदान कक्षापर्यंत आणण्यासाठी मदतीचा हात दिल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी 5ः30 नंतर मतदानाची मुदत संपली. यानंतर मतपेट्या युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरूदक्षिणा सभागृहात आणण्यात येत होत्या.
याच विद्यालयातील स्ट्राँग रूममध्ये आता मतपेट्या सीलबंद केल्या जाणार आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे मतदानाची अंतीम आकडेवारी मिळाली नसून अंदाजे 70 टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
दुपारी 3.30 वा.पर्यंत प्रभाग क्र. 1 मध्ये 2,045 (57.46 टक्के), प्रभाग 2 मध्ये 1045 (39.45 टक्के), प्रभाग 3 मध्ये 1762 (52.82 टक्के), प्रभाग 4 मध्ये 1755 (47.56 टक्के), प्रभाग 5 मध्ये 1796 (51.61 टक्के), प्रभाग 6 मध्ये 1569 (54.23 टक्के), प्रभाग 7 मध्ये 1281 (54.30 टक्के), प्रभाग 8 मध्ये 1728 (51.53 टक्के), प्रभाग 9 मध्ये 1284 (47.52 टक्के), प्रभाग 10 मध्ये 949 (46.18 टक्के), प्रभाग 11 मध्ये 2023 (54.09 टक्के), प्रभाग
12 मध्ये 1216 (57.25 टक्के), प्रभाग 13 मध्ये 1410 (47.51 टक्के), प्रभाग 14 मध्ये 1955 (53.50 टक्के) इतके मतदान झाले होते. सायंकाळी 5.30 वा.पर्यंतची आकडेवारी उशिरापर्यंत पेट्या येण्याचे काम सुरू असल्याने समजू शकली नाही. त्यामुळे साधारणतः 65 टक्क्यांच्या आसपास चिपळुणात मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.