चिपळूण शहर : पुढारी वृत्तसेवा
शहरातील एका नामांकित बँकेतील अधिकारी मुकुंद मुरलीधर पालांडे (33) यांचा मृतदेह तीन दिवसांनी कोळकेवाडी धरणात तरंगताना आढळून आल्यानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी चौघांना अटक केली असून दोन संशयित आरोपी अद्याप फरार आहेत.
न्यायालयाने अटक केलेल्या आरोपींना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुकुंद पालांडे हे बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी चार पानांची सविस्तर सुसाइड नोट लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत काही धक्कादायक खुलासे करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
चिठ्ठी लिहिल्यानंतर त्यांनी थेट कोळकेवाडी धरण गाठल्याचे समोर आले. धरणाजवळ त्यांची दुचाकी बेवारस अवस्थेत आढळल्यानंतर नातेवाईकांनी शोध सुरू केला होता. पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकाने धरण परिसरात शोधमोहीम राबवली आणि रविवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.
सुसाइड नोटच्या आधारे शिरगाव पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. खंडणीची मागणी, शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आरोपींवर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार अनोखी खेडेकर, अखिलेश खेडेकर, योगेश मोरे आणि वेदांत टाकळे या चौघांना अटक करण्यात आली.
उर्वरित दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलिस अधिक्षक बी. बी. महामुनी यांनी चिपळूण येथे भेट दिली. पोलिस अधिक्षक नितीन बगाटे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत पाटील तपास करत आहेत. दरम्यान, शोकाकूल वातावरणात रविवारी मुकुंद पालांडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.