Car Falls in Valley Anuskura Ghat One Dead
राजापूर : कोल्हापूर - राजापूर मार्गावरील अणुस्कुरा घाटात मंगळवारी (दि.३) सुमारे चारशे फूट खोल दरीत कार कोसळून तरुण ठार झाला. कौस्तुभ विजय कुरूप (वय ३०, रा. लांजा) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज (दि. ४) सकाळी उघडकीस आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कौस्तुभ कामानिमित्त कोल्हापूरला गेला होता. मंगळवारी (दि. ३) तो गावी येत असताना अणुस्कुरा घाटात त्याची गाडी खोल दरीत कोसळली. अपघातग्रस्त गाडीची पुरती चाळण झाली होती. गाडीचे अवशेष विखुरले होते. कौस्तुभचे पार्थिव एका बाजूला जाऊन पडले होते. घाटातील धुक्यामुळे अपघात झाल्याचे समजून आले नाही.
दरम्यान, घाटमार्गे प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला रस्त्यावर पडलेले इंजन आढळून आले. त्याने अणुस्कुरा घाटातील चेक पोस्ट वर असलेल्या पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घाटात जाऊन पाहणी केली असता त्यांना अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव, लांजाचे पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह वर काढण्याचे काम सुरु होते. पावसामुळे कामात व्यत्यय येत होता. कौस्तुभच्या निधनाचे वृत्त ऐकून लांजा येथून ग्रामस्थांनी अपघात स्थळी धाव घेतली.