गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे समुद्रात शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तीन तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. यातील अमोल गोविंद ठाकरे (25, रा. भिवंडी) हा तरुण समुद्रात बुडून बेपत्ता झाला होता. त्यानंतर या तरुणाचा शोध घेण्यासाठी जयगड सागरी पोलिस ठाण्याने शनिवारी सायंकाळपासून रात्रभर स्थानिक ग्रामस्थ व जीवरक्षक, पोलिस पाटील, ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य यांच्या मदतीने संपूर्ण गणपतीपुळे समुद्रकिनारा पिजून काढत या तरुणाला शोधण्यात रविवारी पहाटेच्या सुमारास यश मिळवले.
शनिवारी झालेल्या दुर्घटनेनंतर समुद्रात बुडून बेपत्ता झालेला तरुण गणपतीपुळे येथील एमटीडीसीच्या पर्यटन निवासासमोरील समुद्रकिनारी भागात पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला तातडीने वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची कदम यांनी त्याची वैद्यकीय तपासणी करुन मृत घोषित केले. त्या नंतर या तरुणावर शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेचा पंचनामा जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालगुंड गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला. या घटनेतील विकास विजय पालशर्मा (24) आणि मंदार दीपक पाटील (24), दोघेही रा. भिवंडी, यांना समुद्र किनाऱ्यावर तैनात असलेल्या वॉटर स्पोर्ट व्यावसायिक आणि जीवरक्षकांनी प्रसंगावधान राखून वाचवले. शनिवारी सायंकाळच्या वेळी घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी मुंबईनजीकच्या भिवंडी येथून सहा मित्र गणपतीपुळे येथे देवदर्शन आणि पर्यटनासाठी आले होते. त्यापैकी तिघेजण समुद्रात आंघोळीला गेले असता त्यांनी खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही बुडू लागले. त्यांच्या सोबत किनाऱ्यावर असलेल्या मित्रांनी तातडीने आरडाओरडा करून मदत मागितली.
यावेळी मोरया वॉटर स्पोर्ट यांच्या जेटस्की बोटीवरील व्यावसायिकांनी तत्काळ धाव घेत तिघांना पाण्याबाहेर काढले. बुडालेल्या तरुणांना वाचविण्यात स्थानिक व्यवसायिक आणि जीवरक्षकांनीही मोलाचे योगदान दिले. तातडीने तिघांनाही गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. यातील दोघांवर उपचार करून त्यांना सुरक्षित स्थितीत आणण्यात आले.