सह्याद्रीच्या उपरांगांत पाऊल टाकताच माणूस नव्हे, तर त्याची धडपड चालायला लागते. वाकडे-तिकडे उभे असलेले कडे, खोल दऱ्या, घसरती लाल माती आणि अंगावर येणारी राकट भव्यता—याच सह्याद्रीच्या कुशीत खेड तालुक्यातील रसाळगड उभा आहे.
शिवछत्रपतींच्या इतिहासाची साक्ष देणारा हा गड आता भग्नावस्थेत असला, तरी गिरीभ्रमण आणि जंगल सफरीसाठी आजही आकर्षण ठरतो. याच राकट सह्याद्रीत दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हा रोमांचक अनुभव मिळावा, या उदात्त हेतूने दिव्यांगस्नेही उत्तमकुमार जैन यांच्या संकल्पनेतून एक अनोखी मोहीम साकारली.
त्यांनी मुंबईतील दृष्टीहीनांसाठी कार्य करणाऱ्या नयन फाउंडेशनशी संपर्क साधून “दिव्यांग सहल” या उपक्रमांतर्गत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दि.२५ रोजी रसाळगड सफरीचे आयोजन केले. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत १८ ते ५० वयोगटातील तब्बल ८० दृष्टीहीन बांधव या मोहिमेसाठी सज्ज झाले. बँक कर्मचारी, व्यावसायिक, खासगी नोकरी करणारे तसेच विद्यार्थी अशा विविध क्षेत्रांतील सहभागी या मोहिमेत सहभागी झाले होते.
खेड येथील महाराजा प्रतिष्ठानने गडावर सुरक्षित ने-आण, जेवणाची व्यवस्था आदी जबाबदाऱ्या सांभाळल्या. भरणे येथील शिवछत्रपती पुतळ्याला अभिवादन करून ही सहल गडाच्या पायथ्याशी पोहोचली आणि तिथून सुरू झाला अनुभवांचा अद्भुत प्रवास. महाद्वार, पायऱ्या, वराहरूप हनुमानाची मूर्ती, तोफा—या सर्वांना स्पर्श करून सहभागीनी इतिहास अनुभवला.
गडावर प्रा. डॉ. चंद्रशेखर साळुंखे यांनी वन्यजीव, पर्यावरण व सर्पजीव विज्ञानावर मार्गदर्शन केले, तर डॉ. विलास शेळके यांनी प्रथमोपचाराविषयी माहिती दिली. प्रणव महापुस्कर यांनी रसाळगडाचा इतिहास उलगडला, तर उत्तमकुमार जैन यांनी सहभागींसोबत मोकळा संवाद साधला. सामूहिक गाणी, गप्पा आणि महाराष्ट्र गौरव गीत यामुळे वातावरण आनंदमय झाले. नंतर सर्व सहभागींस सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
या मोहिमेसाठी स्वयंसेवक म्हणून प्रणव महापुस्कर, आकाश बैकर, आखाडे, एस. डी. शिर्के, उमेश भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. गडावरील स्वयंपाक, स्वच्छता व सेवेसाठी सौ. कल्पना उत्तमकुमार जैन, निर्मळ मावशी यांनी जबाबदारी सांभाळली, तर छोटा मदतनीस बनी जैन याने उत्साहात सहकार्य केले.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन नयन फाउंडेशनचे पुनलागार देवेंद्र, ओंकार चव्हाण आणि त्यांच्या टीमने अत्यंत सुनियोजितपणे केले. मोहीम पूर्ण झाल्यानंतर सर्व दृष्टीहीन सहभागीनी “इतिहास आणि निसर्गाचा असा थरारक अनुभव आयुष्यात पहिल्यांदाच मिळाला” असे सांगत आयोजकांचे मनापासून आभार मानले.
ही मोहीम म्हणजे सह्याद्रीच्या राकट सौंदर्याइतकीच मानवी जिद्द, आत्मविश्वास आणि समावेशकतेची प्रेरणादायी गाथा ठरली आहे.