

रत्नागिरी: रत्नागिरीत येण्यासाठी लांजा, राजापूरसह विविध आगारातून एसटी बसेस सुटतात. मात्र बसेस वेळेवर येत नसल्यामुळे नोकरदारवर्ग, व्यापारी, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरासह ग्रामीण भागातील एसटी बसेसचे वेळापत्रक वारंवार विस्कळीत होत असल्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
एसटी बसेस एक ते दोन तास उशिरा येत असल्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव वडाप, मिनी बसचा आधार घेऊन रत्नागिरी गाठावी लागते. तसेच सायंकाळी 5 नंतर एसटीबसेस वेळत नसल्यामुळे लांजा, राजापूर, चिपळूण, गुहागरसह विविध भागात जाण्यासाठी प्रवाशांना लालपरीची वाट पहावी लागत आहे.
रत्नागिरी विभागातील 9 आगारातून दररोज हजारो, लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. नोकरीनिमित्त नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी, सामान्य प्रवासी दररोज रत्नागिरीतून ये-जा करीत असतात. त्यामुळे मोठ्याप्रमाणात एसटीबसेसमध्ये गर्दी वाढते. कधी कधीतर एकाच एसटीत 150 हून अधिक प्रवासी कोंबून प्रवास करीत असतात. मात्र नेहमीप्रमाणे रत्नागिरी एसटी विभागाचे वेळापत्रक वारंवार विस्कळीत होत आहे.लांजा, राजापूर, चिपळूणमधून रत्नागिरीला जाण्यासाठी सकाळी बसेस वेळेवर येत नाहीत. तासनतास वाट पहावी लागते. लांब पल्ल्याची एसटी बस आल्यानंतर रत्नागिरीला जाण्यासाठी संधी मिळते त्याठिकाणी जागा मिळत नाही. रत्नागिरीतून सायंकाळी तीच अवस्था 4.30 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत गाड्या वेळेत येत नाहीत. एसटी बसस्थानकात केवळ नावालाच वेळापत्रकाची फलक आहेत मात्र एसटी एकही वेळेवर येत नसल्याचे चित्र आहे.
त्यामुळे नोकरदार, व्यापारी, सामान्य प्रवासी अक्षरशा वैतागला आहे. पास काढल्यामुळे नाईलाजास्तव एसटीची वाट पहावी लागते. काहींना तर वडाप, मिनीबसचा आधार घेवून आपले घर गाठावे लागते. त्यामुळे विभाग नियंत्रक, आगार प्रमुखांनी याकडे लक्ष देवून एसटी बसेसच्या वेळापत्रकात चांगली सुधारणा करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
वेळेवर बसेसचे नियोजन हवे
सध्या शैक्षणिक सहलीसाठी नव्या बसेस शाळांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बसेस अपुऱ्या पडत असतील. मात्र तरीही आहे त्या बसेस वेळेवर सोडणे गरजेचे आहे. सकाळी, सायंकाळी या दोन वेळेस बसेस वेळवर पोहोचवल्यास नोकरदार, व्यापारी, विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता येईल. कोणत्या बसेस कधी सुटतील याचे फलक बस स्थानकावर लावले आहेत मात्र फलकावरील वेळेनुसार बसेस वेळेवर येतच नाही. अचानक बसेस रद्द होतात. त्यामुळे नियोजन असणे गरजेचे आहे.
सणासुदीत, उन्हाळा सुट्टीत बसेसना उशिर होईल हे कारण समजू शकतो; मात्र लांजा, राजापुरातून येण्यासाठी बसेस वेळेवर येत नाहीत. तसेच रत्नागिरी आगारातून लांजा, राजापूर, चिपळूण, गुहागरसाठी वेळेत बसेस नसल्यामुळे एक तास बसची वाट पहावी लागते. त्यामुळे बसेसचे वेळापत्रक व्यवस्थित करणे गरजेचे आहे, असे प्रवासी इम्रान शेख यांनी सांगितले.