Anuskura Ghat landslide file photo
रत्नागिरी

Anuskura Ghat landslide: अनुस्कुरा घाटात कोसळला महाकाय दगड; प्रशासनाची वाट न पाहता विद्यार्थ्यांनी हातानेच हटवला

राजापूर तालुक्यातील ओणी-अणूस्कुरा महामार्गावरील अनुस्कुरा घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून एक महाकाय दगड रस्त्याच्या मध्यभागी येऊन पडला होता.

पुढारी वृत्तसेवा

Anuskura Ghat landslide

राजापूर: राजापूर तालुक्यातील ओणी-अणूस्कुरा महामार्गावरील अनुस्कुरा घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून एक महाकाय दगड रस्त्याच्या मध्यभागी येऊन पडला होता. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. घाटात दाट धुके असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. अशा परिस्थितीत रायपाटण, खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी एकजुटीच्या बळावर हा दगड रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक सुरळीत केली.

झाडे लावण्याच्या मोहिमेसाठी अनुस्कुरा घाटात गेलेल्या स्वयंसेवकांनी रस्त्यावर पडलेला दगड पाहताच प्रशासन किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेतला. कोणतीही यंत्रसामग्री नसताना सर्व स्वयंसेवकांनी एकत्रीत प्रयत्न करून महाकाय दगड हाताने ढकलत रस्त्याच्या कडेला नेला. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता तातडीने खुला झाला.

अनुस्कुरा घाटातील दाट धुके आणि वळणावरील हा अडथळा लक्षात घेता मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र स्वयंसेवकांच्या तत्परतेमुळे संभाव्य अपघात टळल्याची भावना प्रवासी व पर्यटकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील दगड हटविण्यासोबतच परिसर स्वच्छ करून वाहतुकीस सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला.

यावेळी खापणे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील, प्रा. एस. जी. चव्हाण, मधुकर साटम यांच्यासह स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. वृक्षारोपणाचे नियोजित काम काही काळ बाजूला ठेवून विद्यार्थ्यांनी केलेल्या या सामाजिक कार्याचे प्रवासी, पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT