खेड : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी रविवारी दि.३ रोजी खेड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. सावली बारच्या परवान्याच्या मुद्द्यावरून होत असलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना कदम यांनी परब यांना "अर्धवट वकील" म्हणत हेतुपुरस्सर बदनामी करत असल्याचा आरोप केला.
रामदास कदम म्हणाले की, सावली बार चालवण्यासाठी त्यांनी शरद शेट्टी यांना हॉटेल चालवण्यास दिले होते. "ऍग्रीमेंटच्या कॉलम ६ मध्ये स्पष्ट म्हटले आहे की कोणताही बेकायदेशीर व्यवसाय चालवला जाणार नाही. तसेच, कॉलम ७ मध्ये कोणतीही चुकीची कृती आढळल्यास जबाबदारी व्यवसाय चालवणाऱ्याची असेल, मालकाची नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, "जेव्हा काही अनुचित प्रकार समजले, तेव्हा आम्ही तात्काळ शरद शेट्टी यांना हॉटेलमधून बाहेर काढले आणि दोन्ही लायसन्स जूनच्या १३ तारखेला परत दिले. अनिल परब यांनी मात्र यानंतर जुलैच्या १८ तारखेला विधिमंडळात मुद्दा उपस्थित करून दिशाभूल केली."
रामदास कदम यांनी परब यांच्याकडून झालेल्या आरोपांवरून नाराजी व्यक्त करत असेही सांगितले की, "या गोष्टीला आम्ही कुठेही पाठींबा दिलेला नाही. उलट सभापतींकडे अर्ज करून हे आरोप कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. सभापती सभागृहात आल्यानंतर याबाबत निर्णय घेतील"
राजीनाम्याच्या मागणीबाबत बोलताना ते म्हणाले, "तू राजीनामा मागणारा कोण? जेव्हा लायसन्स आधीच परत दिले आहेत, तेव्हा राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही."
शेवटी ते म्हणाले, "उद्धव ठाकरे आणि अनिल परब केवळ योगेश कदम यांना टार्गेट करत आहेत. आम्ही डान्स बारसारखे धंदे कधीच केलेले नाहीत. कावळा कितीही काव काव करत असला तरी आम्ही त्याची दखल घेत नाही."