Uday Samant Pudhari
रत्नागिरी

Uday Samant : गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा

जिल्हाधिकारी कार्यालयात गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठक

पुढारी वृत्तसेवा

All agencies should coordinate to conduct Ganeshotsav peacefully and smoothly: Guardian Minister Uday Samant

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी आपापसात उत्तम समन्वय साधून दक्षतेने काम करावे, असे निर्देश उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. जिल्हा प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सर्वंकष आढावा बैठक झाली. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, उपविभागीय पोलीस अधिकारी आरांक्षा यादव, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मनुज जिंदल व मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

जिल्ह्यात १२७ सार्वजनिक, तर पावणेदोन लाख घरगुती गणपती

बैठकीच्या प्रारंभी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पोलीस दलाच्या पूर्वतयारीचे संगणकीय सादरीकरण केले. जिल्ह्यात यंदा १२७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि सुमारे १ लाख ७० हजार घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे. सार्वजनिक मंडळांना परवानगी घेण्यासाठी यंदा पोर्टलवरुन ऑनलाइन सुविधा देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एसआरपीएफ, आरसीएफ तसेच स्ट्राइक टीम तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

गणेशोत्सव काळात ग्रामीण भागातील रुग्णालये २४ तास कार्यरत ठेवून डॉक्टरांची उपस्थिती निश्चित करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच कोकणवासीयांची गर्दी लक्षात घेता रेल्वे स्थानके व प्रमुख थांब्यांवर आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक तैनात ठेवण्याचे निर्देश दिले.

नगरपालिका क्षेत्रात विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. चिपळूण येथे गणपती विसर्जनासाठी तात्पुरता विसर्जन घाट तयार करून चोख व्यवस्था केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

वाहतूक नियमन व अवजड वाहनांवर निर्बंध

वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी बहादूरशेख नाका येथे महामार्गावर विरुद्ध दिशेची अतिरिक्त लेन (रिव्हर्स लेन) सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. महामार्गावर क्रेन आणि रुग्णवाहिकांची चोख व्यवस्था ठेवण्याच्या सूचना केल्या. गणपती विसर्जनाच्या दिवशी अवजड मालवाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. जेएसडब्ल्यू आणि जेएनपीटी बंदरातून येणाऱ्या अवजड वाहतुकीच्या नियंत्रणासाठी त्यांनी सिंधुदुर्ग व रायगडच्या पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून समन्वय साधला. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या प्रगतीचाही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT