Accident News 
रत्नागिरी

Rajapur Accident News | देवदर्शनाच्या प्रवासात काळानेच घातला घाला; भीषण अपघातात 75 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

Rajapur Accident News | अपघातानंतर राजापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला

पुढारी वृत्तसेवा

  1. रायपाटण टक्केवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू

  2. दुचाकीने कारला मागून धडक दिल्याने महिला रस्त्यावर पडली

  3. रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच मृत्यू

  4. अपघातानंतर राजापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला

  5. अपघाताबाबत पुढील तपास राजापूर पोलीस ठाण्याच्या मार्गदर्शनाखाली सुरू

राजापूर | पुढारी वृत्तसेवा

राजापूर तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथे बुधवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघातात ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. पार्वती तानू तरळ (रा. शिवणे बुद्रुक) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दुचाकी आणि कारच्या धडकेनंतर रस्त्यावर पडलेल्या या महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने ही दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पिंपळे सौदागर येथील रहिवासी तेजस शेलार हे आपल्या कुटुंबीयांसह क्रेटा कार (क्रमांक एमएच १४ एमएल ९६१८) मधून पुण्याहून कुणकेश्वर येथे देवदर्शनासाठी जात होते. गाडीत लहान मुले व इतर कुटुंबीय प्रवास करत होते. रायपाटण टक्केवाडी परिसरात आल्यानंतर, पाचल गुरववाडी येथील दुचाकीस्वार कुणाल धावडे याने आपल्या दुचाकीने या कारला मागून धडक दिली.

या अचानक झालेल्या धडकेमुळे दुचाकीच्या मागे बसलेल्या पार्वती तरळ यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर कोसळल्या. त्याच वेळी रत्नागिरीहून पाचलच्या दिशेने जाणारा एक मालवाहू ट्रक (क्रमांक एमएच ०८ एक्यू ७२६६) घटनास्थळावरून जात होता. दुर्दैवाने रस्त्यावर पडलेल्या पार्वती तरळ या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्या. ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सदर ट्रकचालक संतोष सिद्धार्थ सावंत हा रत्नागिरीहून मालवाहतूक करत असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे व रामदास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला असून अपघाताबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अपघाताच्या वेळी घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांसह रायपाटण टक्केवाडीच्या पोलीस पाटील मृण्मयी रवींद्र पांचाळ तसेच गांगणवाडीचे पोलीस पाटील स्वप्नील गांगण उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT