पक्षी अभ्‍यासक डॉ. श्रीधर जोशी यांच्या कॅमेर्‍यात कैद झालेले ब्‍लॅक हॅरोन पक्षी Pudhari Photo
रत्नागिरी

Black Heron In India |आफ्रिकन पाहुणा थेट चिपळुणात! 'ब्लॅक हेरॉन'च्या भारतातील पहिली नोंद

डॉ. श्रीधर जोशींची ऐतिहासिक कामगिरी : पक्षी अभ्यासकांच्या दृष्टीने ऐतिहासिक घटना

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : चिपळूणच्या पाणथळ परिसरात नुकताच एक अद्वितीय पक्षी दिसून आला आहे . पक्षी निरीक्षक डॉ. श्रीधर जोशी यांच्या नजरेतून दोन काळ्या बगळ्यांचा ब्लॅक हेरॉन (Black Heron – Egretta ardesiaca) हा अत्यंत दुर्मिळ आणि भारतात आजवर न दिसलेला पक्षी प्रथमच आढळून आल्याची नोंद झाली आहे. तो आफ्रिकेतून आला असून ही घटना पक्षी अभ्यासकांच्या दृष्टीने ऐतिहासिक मानली जात आहे.

डॉ. जोशी हे दररोज सकाळी पक्षी निरीक्षणासाठी फिरायला जात असतात. रविवारी (दि. ३ ऑगस्ट) सकाळी फिरताना त्यांनी एका पाणथळ जागी दोन काळे बगळे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मासे पकडताना पाहिले. त्यांनी त्वरित त्यांच्या कॅमेऱ्यात हे क्षण टिपले आणि घरी आल्यावर अधिक माहिती मिळवण्याच्या उद्देशाने सखोल अभ्यास केला.

त्यावेळी त्यांना समजले की, जगात canopy feeding किंवा umbrella feeding ही अनोखी मासे पकडण्याची शैली केवळ ब्लॅक हेरॉन या आफ्रिकन पक्षातच दिसून येते. पक्षी आपले पंख अर्धवर्तुळात पसरण्याची ही अनोखी युक्ती मास्यांना सावलीखाली आकर्षित करते आणि त्यांना सहज पकडता येते.

सुरुवातीला हा रातबगळा (Black-crowned Night Heron) असल्याचा अंदाज काही निरीक्षकांनी व्यक्त केला. मात्र लांब पाय, संपूर्ण काळे शरीर आणि 'कॅनोपी फिडींग'ची खास शैली या वैशिष्ट्यांवरून सर्वांचे एकमत झाले की, तो पक्षी म्हणजेच ब्लॅक हेरॉनच आहे.

ही माहिती व छायाचित्रे डॉ. जोशी यांनी ‘इंडियन बर्ड जर्नल’कडे पाठवली असून भारतात या पक्ष्याची ही पहिलीच अधिकृत नोंद असल्याचे प्राथमिक संकेत आहेत.

ब्लॅक हेरॉन कोण?

Black Heron – Egretta ardesiaca हा मुख्यतः पश्चिम आणि दक्षिण आफ्रिकेत आढळणारा निवासी पक्षी आहे. सेनेगल, सुडान, केनिया, तंजानिया, मोजांबिक आणि मॅडगास्कर हे त्याचे नैसर्गिक अधिवास आहेत. युरोपातही काही अपवादात्मक नोंदी (ग्रीस, इटली, डब्लिन) आहेत. मात्र भारतात आजवर या पक्ष्याचा एकही ठोस पुरावा मिळालेला नव्हता.

काय आहे 'कॅनोपी फिडींग'?
ही एक विशिष्ट मासे पकडण्याची शैली असून पक्षी आपल्या पंखांचा अर्धगोलाकार छत्रीसारखा आकार तयार करतो. त्या सावलीत मासे आकर्षित होतात आणि मग पक्षी त्यांना सहज झडप घालतो. ही शैली प्रामुख्याने ब्लॅक हेरॉनमध्येच दिसते.

हा पक्षी स्थलांतर करत नाही. केवळ अन्नपाण्याची कमतरता असल्यास तो परिसर बदलतो. त्यामुळे त्याच्या चिपळूणमध्ये अचानक झालेल्या आगमनाने आश्चर्य व्यक्त होत आहे.

"आफ्रिकेतील हे पक्षी चिपळूणमध्ये कसे आले, याचे उत्तर सध्या तरी गूढच आहे. गेल्या आठवड्यापासून मी ते पुन्हा पाहण्यासाठी विविध पाणथळ ठिकाणी शोध घेत आहे."
— डॉ. श्रीधर जोशी, पक्षी निरीक्षक, चिपळूण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT