कुडाळ (सिंधुदुर्ग) : पुढारी वुत्तसेवा : आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. कुडाळ तहसीलदार कार्यालयावर टाळ, मृदुंगाच्या गजरात, शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधाचे फलक व भगवे झेंडे हाती घेत हा मोर्चा काढण्यात आला, यावेळी तहसीलदारांना दोषींवर कारवाई करण्यासाठीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी ज्ञानोबा माऊलींची भजने म्हणत काढलेल्या या मोर्चा वेळी शिंदे-फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. हिंदुत्वाच्या विचारांचे सरकार म्हणून मिरवणाऱ्या या सरकारने वारकऱ्यांवर लाठीचार्च करुन गतवर्षी सत्तासंघर्षात उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले असताना देखील ठाकरेंनीच विठ्ठलाची पुजा करावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली होती, म्हणूनच तो राग मनात ठेवून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज करून राग काढल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
यावेळी आ.वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काॅग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, कुडाळ तालुका अध्यक्ष अभय शिरसाट, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक आदी सह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी -कार्यकर्ते उपस्थित होते.
-हेही वाचा