कुडाळ, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्यात यापुढे 'पॅलेस पॉलिटिक्स' चालणार नाही. हे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लक्षात घ्यावे. आम्हाला तुमच्या बद्दल आदर असुन जनतेला भडकवण्याचे काम तुम्ही बंद करावे, अन्यथा मी पत्रकार परिषद घेवून वेळोवेळी उत्तर देईन, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उध्दव ठाकरे यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. ज्यांची जोडे पुसायची लायकी नाही ते सरकार चालवत आहेत, अशी जहरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर केली होती. याबाबत पत्रकारांनी ना. केसरकर यांना विचारले असता त्यांनी यापुढे महाराष्ट्रात पॅलेस पॉलिटिक्स चालणार नसल्याचे ठणकावुन सांगितले.
कुडाळ येथील शिवसेना पदाधिकार्यांच्या मेळाव्यासाठी दीपक केसरकर आले असता यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. केसरकर म्हणाले की, तुम्ही पत्रकार परिषद घेतली तर मी सुध्दा पत्रकार परिषद घेवून मी उत्तर देईन. तुम्ही लोकांना किती भडकवले, कितीही रिफायनरी प्रकल्प थांबवण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगावे लागेल. आपल्या विरोधात गेले की ते थांबवायचे आणि आंदोलन घडवून आणायची आणि मग त्याच्यावर राजकीय पोळी भाजायची याच्या पलीकडे जाऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. कारण महाराष्ट्राचा विचार करणे हे बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला शिकवले. त्या विचारापासून उध्दव ठाकरेंनी लांब जाऊ नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल दिल्लीपर्यंत घेतली जाते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांचे थोडे तरी कौतुक करा, असा सल्ला केसरकर यांनी संजय राऊत यांना दिला.
महाराष्ट्र राज्यात यापुढे पॅलेस पॉलिटिक्स चालणार नाही हे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लक्षात घ्यावे. आम्हाला तुमच्या बद्दल आदर असुन जनतेला भडकवण्याचे काम तुम्ही बंद करावे. अन्यथा मी पत्रकार परिषद घेवून वेळोवेळी उत्तर देईन असे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी उध्दव ठाकरे यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले.