रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : भर दिवसा रिक्षामध्ये बसलेल्या तरुणीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणार्या रिक्षा चालकाच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या. ही घटना मंगळवार 13 जून रोजी 3.30 वा. ते 4.30 वा. दरम्यान जयस्तंभ ते कुवारबावकडे जाणार्या रस्त्यावर घडली होती.
पोलिसांनी दिलेलया माहितीनुसार, अविनाश म्हात्रे (43,रा.शांतीनगर,रत्नागिरी) असे रिक्षा चालकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी एक 18 वर्षीय तरुणी एकटीच अविनाशच्या रिक्षामधून आपल्या घराकडे जाण्याकरिता प्रवास करत असताना त्याने प्रवासा दरम्याने या तरुणीसोबत असभ्य व अश्लील वर्तन केले.
या तरुणीने मोठया हुशारीने या रिक्षाचा अचूक नंबर लिहून घेतला तसेच सोशल मिडीयावर पोस्ट करून मदतीची साद घातली व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेबाबत तक्रार दिली.
तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपीला बुधवारी रात्री अटक केली आहे. त्यानंतर आरोपीला गुरूवारी (दि. 15) जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, दिवसा अगर रात्री – बेरात्री रिक्षा, बस, ट्रेन अथवा कोणत्याही प्रवासी वाहनाने एकट्या प्रवास करत असाल तर त्या वाहनाचा नंबर आपल्या मोबाईलद्वारे टिपून घ्यावा. आपल्या पालकांना नातेवाईकांकडे शेअर करावा. प्रवासा दरम्यान आपल्याला जर अश्या चालकांच्या संशयित व व विकृत हालचाली दिसून आल्यास किंवा संशय आला तरी देखील लागलीच 112 वर अथवा हेल्पलाइन नंबर 1091, तसेच रत्नागिरी पोलीस नियंत्रण कक्ष 02352-222222 वर संपर्क साधावा.
मनामध्ये कोणत्याहीप्रकारची भीती न बाळगता तात्काळ आपण आपल्या नातेवाईकांकडे अथवा पोलीसांकडे मदतीसाठी संपर्क करावा. रत्नागिरी पोलीस दलाच्या अधिकृत टवीटर हँडल,फेसबुक अथवा इन्स्टाग्राम, कू वर देखील आपण अशी घटना लागलीच टॅग करू शकता, असे पोलीसांनी आवाहन केले आहे.
-हेही वाचा