रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : एका महिलेकरवी रत्नागिरीतून अहमदाबादला ड्रग्जचा सप्लाय झाल्याने गुजरात पोलिसांचे एक पथक आरोपीच्या शोधात आज (दि. २४) रत्नागिरीत दाखल झाले आहे. मात्र, रत्नागिरी शहर पोलिसांनी १८ फेब्रुवारीला त्यातील संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून तो आरोपी सध्या न्यायालयीन कस्टडीत असल्याची माहिती पुढे आली आहे.
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील नावरंगपुरा पोलिसांनी ड्रग्जविरोधात मोठी कारवाई केली होती. याप्रकरणी जयजायलो हेमंतकुमार देसाई (रा. अंबाडी, जि. सुरेंद्रनगर) याला २० फेब्रुवारीरोजी अहमदाबाद पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून मोठ्याप्रमाणात ड्रग्ज हस्तगत करण्यात आले होते. त्याला ड्रग्जचा सप्लाय कोणाकडून झाला. याबाबत गुजरात पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता राजश्री प्रवीणचंद्रा देसाई हिच्यासोबत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली होती. तसेच राजश्री हिने हे ड्रग्ज अब्दुल मार्टीन उर्फ हसनमियाँ डोंगरकर (रा. कर्ला, रत्नागिरी) याच्याकडून आणल्याचे गुजरात पोलिसांना सांगितले होते.
या माहितीच्या आधारे गुजरात पोलिसांची एक पथक डोंगरकर याच्या शोधात सोमवारी रत्नागिरीत दाखल झाले. शहर पोलीस ठाण्यात त्यांनी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांची भेट घेऊन त्यांना गुन्ह्याबाबत माहिती दिली. या आरोपीला अटक करण्यासाठी शहर पोलिसांची मदत गुजरात पोलिसांनी मागितली.
ज्यावेळी आरोपीचे नाव गुजरात पोलिसांनी सांगितले. त्यावेळी गुजरात पोलिसांना हवा असलेला आरोपी गुन्हा रजिस्टर नं. ३८/२३ एनडीपीएस ऍक्ट ८(क) २२ (अ) अन्वये शहर पोलिसांनी त्याला १७ फेब्रुवारीरोजी अटक केली. तसेच हा संशयित आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती रत्नागिरी पोलिसांनी गुजरात पोलिसांना दिली.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा ताबा घेण्यासाठी आता गुजरात पोलीस रत्नागिरी न्यायालयात अर्ज करणार असून न्यायालयाच्या आदेशानंतर या आरोपीचा ताबा गुजरात पोलिसांना मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा