राजापूर : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटक्षेत्रातील वाहनांची सुरक्षा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सदैव दरड कोसळण्याचा धोका असलेल्या अणूस्कुरा घाटात सोमवारी एक मध्यम स्वरूपातील दगड रस्त्यावर येऊन पडला होता. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी वाहन चालकांच्या सहकाऱ्याने तो दगड तत्काळ हटविला. सुदैवाने यादरम्यान तिथून कोणतंही वाहन जात नसल्याने अनर्थ टळला.
अणूस्कुरा घाट वाहतूकीसाठी जरी अनुकूल वाटत असला तरी केव्हा दरड कोसळेल याचा काही नेम नाही, अशी स्थिती असते. गेल्या वर्षी दरड कोसळून मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर येऊन पडला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने तो वेळीच हटवून घाटमार्गे वाहतूक पूर्ववत सुरु केली होती.
महाराष्ट्रात यंदा मान्सूनचे आगमन लवकर झाले असून रविवारी मध्यरात्री अणूस्कुरा घाटात एक दगड रस्त्यावर येऊन पडला. मात्र त्याचा वाहतुकीवर परीणाम झाला नव्हता. सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यवाही करण्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांना त्याची माहिती मिळताच त्यांनी घाटात धाव घेतली होती. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घाटातून जाणाऱ्या वाहन चालकांच्या मदतीने तो दगड हटवून घाटातील वाहतूक सुरळीत केली होती.
या घटनेनंतर मान्सूनमध्ये अणूस्कुरा घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. घाटमार्गावर पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे दगड पडणे, मातीचा ढिगारा कोसळणे अशा घटना घडतात. याचे स्वरुप आणि परिणाम किरकोळ दिसत असले तरी भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या घाटाकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणीही आता केली जात आहे.
अणूस्कुरा घाट हा नयनरम्य मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे. निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक या मार्गावरून जाण्यास पसंती दर्शवतात. अणूस्कुरामार्गेच कोल्हापूर, पुणे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारी आणि तिकडून येणारी वाहतूक सुरु असते. सोशल मीडियावर या घाटाविषयी उत्सुकता पाहता दिवसागणिक घाटमार्गावरील वाहतूक वाढणार अशी चिन्हे आहेत. त्यामुळे पावसाळ्यात घाट कसा सुरळीत आणि सुरक्षित राहील याची मोठी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर येऊन ठेपली आहे.