Manoj Jarange Maratha Reservation Pudhari
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मी उन्हात बसलो, तर तुम्हाला चटके बसतील; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा, एकनाथ शिंदेंचं केलं कौतुक

Manoj Jarange Hunger Strike Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Manoj Jarange Hunger Strike Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे भरउन्हात शेतात बसून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने दिलेली आश्वासने आणि मराठा समाजाच्या मागण्यांबाबत अद्याप ठोस निर्णय न झाल्याने जरांगे यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

उपोषणाच्या पहिल्याच दिवशी जरांगे यांनी सरकारला इशारा देत ठाम भूमिका मांडली. “मी उन्हात बसलो, तर तुम्हाला चटके बसतील,” असा थेट इशारा देत त्यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष न करण्याचा संदेश दिला. मराठा समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करताना ते म्हणाले, “मराठा समाजावर झालेला अन्याय मी सहन करू शकत नाही.”

आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करू नका

सरकार आणि प्रशासनाला उद्देशून बोलताना जरांगे पाटील यांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये, अशी विनंती केली. “आमचं आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न करू नका. आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला, तर ते आणखी लांबेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

मराठा आरक्षणाचा प्रश्न केवळ राजकारणाचा विषय नसून समाजाच्या अस्तित्वाचा मुद्दा असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

शिंदेंचं कौतुक, सरकारवर दबाव

यावेळी बोलताना जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक देखील केलं. “एकनाथ शिंदेंनी जसं काम केलं, तसं कुणी करत नाही,” असं वक्तव्य त्यांनी केलं. मात्र, सरकारने केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

स्वतंत्र मंत्रालयाची मागणी

जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ओबीसी-मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी केली. समाजाच्या प्रश्नांवर स्वतंत्र पातळीवर निर्णय घेण्यासाठी ही यंत्रणा आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

सरकारचं आश्वासन काय?

दरम्यान, सरकारकडून मराठा समाजासाठी पुढील आठ दिवसांत हेल्पलाईन सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून आरक्षण, प्रमाणपत्रे आणि विविध शासकीय प्रक्रियांबाबत मदत मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आता जरांगे यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून, सरकार पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT