RBI Gold Missing Claim: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते निलेश कराळे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला होता की, रिझर्व्ह बँकेतून (RBI) तब्बल 1.28 लाख कोटी रुपयांचं सोने गायब झाले आहे. या दाव्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने या प्रकरणावर स्पष्टीकरण देत हा आरोप चुकीचा असल्याचं सांगितलं आहे.
महासंचालनालयाने X (ट्विटर)वर पोस्ट करत स्पष्ट केलं की, RBI मधून सोने गायब झाल्याचा दावा चुकीच्या माहितीवर आधारित आहे. प्रत्यक्षात फेब्रुवारी 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती घसरल्यामुळे RBI च्या सुवर्णसाठ्याच्या 'मूल्यात' घट झाली आहे. सोन्याच्या प्रमाणात नाही.
RBI कडे असलेलं सोनं जसंच्या तसं आहे. पण जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाल्यामुळे त्या सोन्याची रुपयातील किंमत घटली. त्यामुळे आकडेवारीत साठ्याचं मूल्य कमी दिसत आहे. याच आकड्यांचा गैरअर्थ काढत '1.28 लाख कोटींचं सोने गायब' असा दावा केला जात आहे.
या व्हिडिओमध्ये संदर्भ म्हणून दिलेल्या NDTV Marathi च्या बातमीतही सोन्याच्या किमती घसरल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. RBI च्या सुवर्णसाठ्याचं मूल्य हे दररोज आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या भावांवर अवलंबून असतं. भाव वाढले की साठ्याची किंमत वाढते, भाव घसरले की किंमत कमी दिसते. यात प्रत्यक्ष सोने कमी-जास्त होत नाही. त्यामुळे गायब झालं असा शब्दप्रयोग पूर्णपणे चुकीचा आहे.
या प्रकरणातून पुन्हा एकदा एक गोष्ट अधोरेखित होते की, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दाव्यांवर विश्वास ठेवण्याआधी अधिकृत स्रोत तपासणं अत्यंत गरजेचं आहे. आकडे संदर्भाशिवाय मांडले की, सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम पसरतो आणि अनावश्यक संशय निर्माण होतो.
थोडक्यात सांगायचं तर, RBI मधून सोनं गायब झालेलं नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे केवळ सुवर्णसाठ्याच्या मूल्यामध्ये घट झाली आहे आणि त्याचाच चुकीचा अर्थ लावून हा व्हायरल दावा करण्यात आला आहे.