Abhijeet Dipke Viral Video Pudhari
महाराष्ट्र

Abhijeet Dipke Video: 'तुम्ही बाहेर जा, तुम्हाला काय...?', अभिजीत दिपके आणि पोलीस अधिकाऱ्यामध्ये वाद, PSIला घराबाहेर काढलं

Abhijeet Dipke Viral Video: कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके आणि एका पोलीस अधिकाऱ्यामधील शाब्दिक वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Abhijeet Dipke Viral Video: 'कॉक्रोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिपके आणि एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये घरातच शाब्दिक वाद झाल्याचे दिसत असून, दिपके संबंधित अधिकाऱ्याला आपल्या घरातून बाहेर जाण्यास सांगताना दिसत आहेत.

व्हिडिओनंतर या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली असून, अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेमके काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी काही नागरिक त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने आलेल्या नागरिकांशी अयोग्य पद्धतीने संवाद साधल्याचा आरोप दिपके यांनी केला. यामुळे वातावरण अचानक तापले आणि दिपके यांनी थेट त्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

पोलीस अधिकाऱ्याला विचारला जाब

व्हिडिओमध्ये दिपके संबंधित अधिकाऱ्याला त्यांचे पोलीस ठाणे, पद आणि ओळख विचारताना दिसतात. तसेच उपस्थितांना त्या अधिकाऱ्याचे नाव नोंदवून ठेवण्यासही सांगतात.

दिपके यांचा आरोप आहे की, त्यांच्या घरी येणाऱ्या नागरिकांशी पोलिसांनी उद्धटपणे वागू नये. घरात कोणाला भेटायचे आणि कोणाशी चर्चा करायची, हा निर्णय आपणच घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"माझ्या घरात अशी वागणूक चालणार नाही"

वाद अधिक तीव्र होत असताना दिपके यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला घराबाहेर जाण्यास सांगितले. आपल्या घरी येणाऱ्या लोकांशी अशा प्रकारची भाषा किंवा वागणूक स्वीकारली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

या घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या काही जणांनी संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. त्यानंतर हा व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला.

सोशल मीडियावर चर्चा

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या घटनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण दिपके यांच्या भूमिकेला पाठिंबा देताना दिसत आहेत, तर काहींनी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेबाबत अधिकृत माहिती समोर यावी ही मागणी केली आहे.

दरम्यान, या घटनेबाबत संबंधित पोलीस विभागाकडून अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे व्हिडिओतील आरोप आणि घडामोडींबाबत अधिकृत स्पष्टीकरण येणे अद्याप बाकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT