Maharashtra Politics Pudhari
महाराष्ट्र

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्यावरून ठाकरे गटात मतभेद

बारामती पोटनिवडणूक: शरद पवार गटाचा पाठिंबा; काँग्रेसमुळे मविआमध्ये पेच

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यावरून शिवसेना ठाकरे गटात मतभेद झाल्याचे चित्र असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे नजरा लागल्या आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असताना काँग्रेस पक्ष मात्र उमेदवार देत स्वबळावर लढणार असल्याने महाविकास आघाडीत मोठा पेच निर्माण झाला आहे.

ठाकरे गटात दोन मतप्रवाह?

मातोश्रीवर झालेल्या बैठकीत बारामती पोटनिवडणुकीच्या विषयावरून नेत्यांमध्ये दोन गट पडल्याचे समजते. शिवसेना ठाकरे गटाच्या एका गटानुसार, राज्याच्या राजकीय परंपरेनुसार निधनानंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. अजित पवारांचे उद्धव ठाकरेंसोबत असलेले घनिष्ठ संबंध पाहता, त्यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणे योग्य ठरेल, तर ठाकरे गटातील दुसऱ्या गटाने सुनेत्रा पवार या महायुतीकडून लढत असताना आपण त्यांना पाठिंबा का द्यावा?

जर इथे माघार घेतली, तर पक्ष आणि कार्यकर्त्यांचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली. राहुरी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने किंवा मविआतील इतर कोणीही आपला उमेदवार दिला नाही, तर शिवसेना ठाकरे गटाने तिथे आपला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव ठाकरे गटातील एका गटाने मांडला आहे. बारामती आणि राहुरी या दोन जागांवरून महाविकास आघाडीत एकवाक्यता दिसत नसल्याचे सांगितले. काँग्रेसने आधीच स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असताना, ठाकरे गटातील या अंतर्गत वादामुळे मविआच्या एकजुटीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नाराज असलेल्यांंसाठी बिनविरोध निवडणूक हा अन्याय : राऊत

महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही जागा शरद पवार यांच्या पक्षाच्या आहेत, त्यामुळे अंतिम निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. राहुरीसाठी आमच्या पक्षातून 3 जण इच्छुक आहेत; पण मविआ म्हणून आम्ही एकत्रित निर्णय घेऊ. बारामतीबाबत सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली आहे. मात्र, याबाबत उद्धव ठाकरे भूमिका जाहीर करतील. अजित पवारांच्या निधनाबद्दल आदर आणि सहानुभूती आहेच; पण म्हणून निवडणुका लढवायच्या नाहीत हा अट्टाहास चुकीचा आहे. जे लोक सरकारवर नाराज आहेत, त्यांच्यासाठी बिनविरोध निवडणूक हा अन्याय ठरेल, असेही राऊत म्हणाले.

हर्षवर्धन सपकाळांना सुनेत्रा पवारांचा फोन

बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसने पाठिंबा द्यावा, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना रविवारी केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सपकाळ यांना रविवारी फोन करून सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवरील निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा बोलून दाखवली होती. मात्र, काँग्रेसने ही पोटनिवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते.

ठाकरेंसह महादेव जानकर यांनाही फोन

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंबा मागितला होता. त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याशीही फोनवरून चर्चा केल्याचे समजते.

लक्ष्मण हाकेंचीही तयारी

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. बारामतीत धनगर समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने धनगर समाजाचा उमेदवार दिल्यास सुनेत्रा पवार यांच्यासमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT