Maharashtra Assembly Polls |
निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असल्याने जिल्हावासीयांमध्ये प्रचंड उत्कंठा लागून राहिली आहे File Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

कोण म्हणतंय येत नाय... आल्याशिवाय रहात नाय...

Maharashtra Assembly Polls | आज फुटणार फटाके, जिल्ह्यात होणार जल्लोष : कार्यकर्ते जोशात

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असल्याने जिल्हावासीयांमध्ये प्रचंड उत्कंठा लागून राहिली आहे. जिल्ह्यात 109 उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी मातब्बर उमेदवारांमध्ये टस्सल होत आहे. त्यामुळे या दोन्ही बाजूंकडील कार्यकर्ते जोशात असून ते आपापल्या विजयावर ठाम आहेत. सकाळी 10 वाजल्यापासूनच फटाके फुटायला सुरूवात होणार आहे. फेर्‍यांची मोजणी जसजशी पूर्ण होईल तसतसे जल्लोषाला उधाण येणार आहे. गुलालाची उधळण होणार असून त्यासाठी कार्यकर्ते आत्तापासूनच जल्लोषाच्या तयारीत आहेत.

विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत त्या त्या ठिकाणी लागणार आहे. त्यासाठी मतमोजणीची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी 10 ते 11 वाजल्यापासूनच मतमोजणीचा कल समजू लागणार आहे. यामुळे अंदाज घेऊन कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण होणार आहे. ‘कोण म्हणतंय येत नाय... आल्याशिवाय राहत नाय..’ अशा गगनभेदी आरोळ्या आसमंतात फुटणार असून जल्लोषाला उधाण येणार आहे. सातारा जिल्ह्यात सातारा-जावली, कोरेगाव, माण-खटाव, वाई-खंडाळा-महाबळेश्वर, फलटण, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण असे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. कोरेगाव मतदारसंघात महायुतीचे आ. महेश शिंदे व महाविकास आघाडीचे आ. शशिकांत शिंदे यांच्यात हाय व्होल्टेज लढत होत आहे, तर माण-खटावमध्ये महायुतीचे आ. जयकुमार गोरे व महाविकास आघाडीचे प्रभाकर घार्गे यांच्यात काँटे की टक्कर पहायला मिळणार आहे.

वाई मतदारसंघातही महायुतीचे आ. मकरंद पाटील व महाविकास आघाडीच्या सौ. अरुणादेवी पिसाळ यांच्यात चुरस आहे. येथे शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी बंडखोरी केली असून त्यांचेही आव्हान आहे. कराड उत्तरमध्ये महाविकास आघाडीचे आ. बाळासाहेब पाटील व महायुतीचे मनोजदादा घोरपडे यांच्यात जोरदार घमासान होणार आहे. कराड दक्षिणेतही माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व महायुतीचे अतुल भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पाटणमध्ये महायुतीचे ना. शंभूराज देसाई यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे हर्षद कदम व राष्ट्रवादी शरद पवार गटातील पारंपरिक प्रतिस्पर्धी सत्यजित पाटणकर यांच्यात तिरंगी सामना होत आहे. येथे महाविकास आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. फलटणमध्ये महाविकास आघाडीचे आ. दीपक चव्हाण व महायुतीचे सचिन पाटील यांच्यात कडवी लढत पाहायला मिळणार आहे. सातारा-जावलीत महायुतीचे आ. शिवेंद्रराजे भोसले व महाविकास आघाडीचे अमित कदम यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे या सर्व मतदारसंघांतील निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.

कधी कानी पडणार ‘ती’ गुड न्यूज...

कधी एकदा आपल्या नेत्याच्या विजयी आघाडीची आकडेवारी कानी पडते अशी उत्सुकता मातब्बर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे पहिल्या फेरीचा निकाल हाती येताच आसमंत फटाक्यांच्या आवाजांनी भेदरून जाणार आहे. विजयी उमेदवाराचा जयघोष होणार असून विविध घोषणांनी कार्यकर्ते परिसर दणाणून सोडणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.