जालना, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर निवडणुकीचा ज्वर जोरात होता. आता निवडणूक संपल्यानंतरच्या संदेशांना मात्र महापूर आल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा निवडणुकीचा ताप कमी होऊ लागला. 'झाले इलेक्शन, जपा रिलेशन !' असे प्रेमाचे संदेश ग्रुप्सच्या सीमा पार करून प्रत्येक मोबाईलवर पोहोचू लागल्या आहेत.
निवडणुका जाहीर झाल्यापासून पक्षोपक्षांच्या समर्थकांना मोठा जोर चढला होता. आपल्या नेत्याचे कौतुक करण्यापासून विरोधी नेत्याचे जमेल तसे वाभाडे काढण्यापर्यंत सगळे प्रकार या निवडणूक काळात झाले. परंतु, निवडणूक संपल्यानंतर मात्र राजकीय भांडणे थांबविण्यापासून ते निवडणुकीच्या अंदाजापर्यंत सगळ्या विषयाचे संदेश आता ग्रुप्सवर जागा व्यापू लागले आहेत. प्रचाराच्या काळात दिसलेला टीकेचा सूर आणि कडवटपणा मागे ठेवा.
गेले महिना ते दीड महिना शासनाच्या विविध विभागाचे कर्मचारी हे निवडणूक कामासाठी वर्ग करण्यात आले होते. आता विधानसभेची निवडणूक संपलेली आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी त्याची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निवडणूक कामासाठी नेमण्यात आ- लेले कर्मचाऱ्यांनी आता सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र निवडणूक संपली, आता मूळ प्रशासकीय कामावर हजर व्हावे अशा अप्रत्यक्ष सूचना जिल्हा प्रशासनाकडून मिळाल्या आहेत.