पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी शिंदे सेनेच्या नेत्या शायना एनसी (Shaina NC) यांचा 'इम्पोर्टेड माल' असा उल्लेख केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी अरविंद सावंत यांच्यावर नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शायना एनसी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर महाविकास आघाडीचा उल्लेख महाविनाश आघाडी करत शायना एनसी यांनी जोरदार हल्लाबोल केला. या वादाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"कोणाचाही अपमान झालेला नाही. अरविंद सावंत हे आमचे वरिष्ठ खासदार आहेत. ते सहजपणे म्हणायला गेले की, मुंबादेवी येथील भाजपचे उमेदवार (शायना एनसी) बाहेरून आल्या असून त्या 'इम्पोर्टेड माल' आहेत. जर त्या 'इम्पोर्टेड माल' आहेत; यात महिलांचा अपमान कसा?...'बहार का माल है तो बहार का माल है'... तुम्ही सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याबद्दल काय म्हणाला होता? तुम्ही एकदा इतिहासात जाऊन बघा... जर का एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने येऊन निवडणूक लढवली तर लोक म्हणतात की ते बाहेरून आले आहेत. एवढा वाद निर्माण करण्याची गरज नाही.'' असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
अरविंद सावंत यांनी 'माल' म्हणून संबोधल्याचा आरोप शायना एनसी यांनी केला आहे. तसा व्हिडीओ त्यांनी दाखवला आहे. सावंत यांनी महिलांचा अपमान केला असून त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. सावंत यांच्या अवमानजनक वक्तव्यामुळे राज्यातील नारीशक्ती येत्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला धडा शिकवेल, असे शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सांगितले.
"नागपाडा पोलिस ठाण्यात कलम ७९ आणि ३५६ (२) अंतर्गत एफआयआर नोंद झाले आहे. निवडणूक आयोग आणि महिला आयोगानेही याची दखल घेतली आहे. ही महिलांच्या सन्मानासाठी लढाई आहे. महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांच्या विनयशीलतेचा अपमान करणे ही काही छोटी समस्या नाही. व्हिडीओतून सत्य सर्वांसमोर येईल. पण यातून विकृत मानसिकता दिसून येते.", असे शायना एनसी यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना केले आहे.
शायना एनसी यांनी २८ ऑक्टोबर रोजी भाजप सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे यांनी त्यांना मुंबादेवीतून उमेदवारी दिली. मुंबादेवी जागेवर काँग्रेसचे उमेदवार अमीन पटेल यांच्या विरोधात शायना एनसी निवडणूक रिंगणात आहेत.
माझ्याकडून महिलांचा अवमान कधीच होणार नाही. जे मी विधान केले आहे, त्यात त्यांचे नाव कुठे आहे? हे त्यांनी सांगावे. दुसरे म्हणजे ते विधान मी हिंदीत केले होते. त्यात मी माझ्या उमेदवारालाही माल म्हटले होते. ते कसे काय गाळून सांगता?, असे स्पष्टीकरण अरविंद सावंत यांनी दिले आहे.