सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी राजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षांमध्ये उमेदवारी दाखल केलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकार्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनीष काळजेे यांनी महायुतीच्या उमेदवारांना दिलेला पाठिंबा शहराध्यक्ष मनोज शेजवाल आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार उमेश गायकवाड यांना रुचला नाही. त्यामुळे दोन्ही जिल्हाप्रमुखांवर त्यांनी टीकेची झोड उडवली आहे.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे गटाला न सुटल्यामुळे शिंदे गटातील सर्व पदाधिकार्यांनी भाजपच्या विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ऐनवेळी शिंदे गटालाही रामराम ठोकत छत्रपती संभाजी राजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्याकडून उमेदवारी मिळवली. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिंदे, मध्य विधानसभा मतदारसंघातून काळजे, दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेश गायकवाड त्यांनी उमेदवारी दाखल केली. या पदाधिकार्यांसोबत शहराध्यक्ष मनोज शेजवालही होते.
शिंदे, काळजे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. महापालिकेत शिंदे गटाला 25 जागा सोडण्यास भाजप तयार झाल्याने पुन्हा हातमिळवणी केली. त्यामुळे शहराध्यक्ष शेजवाल, गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. कोणत्या परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी गद्दारी करणार नाही असे सांगत गायकवाड यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
सोलापुरातील शिंदेसेनेच्या पदाधिकार्यांचा प्रस्ताव भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस यांनी चर्चा केली. या प्रस्तावास हिरवा कंदील दिल्याने हा समजोता झाल्याचे जिल्हाप्रमुख शिंदे यांनी जाहीर केले. भविष्यात आपण शिंदे यांच्याबरोबर एकदिलाने काम करत महापालिकेत जास्ती जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याचे त्यांनी सांगितले.