
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांचे चिरंजीव माजी मंत्री आदित्य ठाकरे या दोघांचीही नांदेडला सभा होणार नाही. नुकताच या दोघांचाही दौरा कार्यक्रम पुढे आला असून त्यात ही बाब स्पष्ट झाली. यामुळे शिवसेना उबाठा कार्यकर्ते मात्र, गोंधळात पडल्याचे दिसते.
शिवसेना उबाठा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी - काँग्रेस शरद पवार गट यांचा मित्रपक्ष आहे. उबाठाचा नांदेड जिल्ह्यात एक उमेदवार आहे. येथेही शेकाप या मित्रपक्षासोबत त्यांची मैत्रीपूर्ण लढत आहे. दरम्यान नांदेड उत्तर मतदारसंघात त्यांनी अधिकृत घोषित केला नसला तरीही आणि या उमेदवाराचा अब अर्ज रद्द करावा, असे पत्र दिले होते तरीही आयोगाच्या निर्णयामुळे संगीता पाटील डक यांच्या रुपाने दुसरा उमेदवार सुद्धा रिंगणात आहे. या मतदारसंघात उबाठा कार्यकर्ते कोणाचा प्रचार करणार हे पण गुलदस्त्यात आहे.
दरम्यान आजवरच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे प्रत्येकवेळी नांदेड येथे प्रचारासाठी आले होते. त्यांच्या येथे जाहीर सभाही झाल्या. परंतु यावेळी राज्याच्या सत्तेसाठी हातघाईचे लढाई असतानासुद्धा ठाकरे पिता पुत्र नांदेडमध्ये कुठेही सभा घेणार नाही, असे त्यांच्या दौ-यावरून स्पष्ट होते.
दरम्यान उद्धव ठाकरे ८ नोव्हेंबर रोजी मराठवाड्यात आहेत. या दिवशी त्यांची जालना जिल्ह्यातील परतूर येथे सभा होणार आहे. तर ९ रोजी दुपारी हिंगोली, कळमनुरी तसेच सायंकाळी परभणी व गंगाखेड अशा एकूण पाच सभा होणार आहेत. या सभा आटोपल्यानंतर ते गंगाखेड येथून नांदेडला येतील. येथून मुंबईकडे रवाना होतील.