सिन्नर : स्व. शंकरराव वाजे, स्व. रुख्मिणीबाई वाजे, स्व. सूर्यभान गडाख, स्व. तुकाराम दिघोळे या लोकप्रतिनिधींनी सिन्नर तालुक्यात विकासाची गंगा आणली. उद्योगवाढीस नेल्याने रोजगार मिळाला. मधल्या काळात रखडलेली विकासाची गती वाढविण्यासाठी सिन्नर विधानसभा मतदार संघात परिवर्तन घडवा, असे आवाहन खासदार शरद पवार यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार युवा नेते उदय सांगळे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (दि.13) पंचायत समिती कार्यालयासमोर जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
स्व. गडाख नाना आणि स्व. दिघोळे यांच्यासोबत काम करताना आम्ही या तालुक्यात औद्योगिक वसाहतींची मुहूर्तमेढ रोवली. हजारो तरुणांच्या हातांना रोजगार मिळाला. पुढे आम्ही या तालुक्यात सेझ प्रकल्प आणला मात्र महायुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्याला गती मिळाली नाही. एकही उद्योग या सेझमध्ये उभा राहू शकला नाही, हे दुर्दैव आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी भाजपला साथ दिली. सरकार स्थापन केले. पण, शेती, उद्योगांसाठी त्यांनी काय केले, असा सवालही खा. पवार यांनी उपस्थित केला. उदय सांगळे यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला तुतारीचे बटन दाबून विधानसभेत जाण्याची संधी द्या, असेआवाहन त्यांनी केले.
दरम्यान, खासदार पवार यांच्या सभेत तरुण मतदारांचा प्रचंड उत्साह बघायला मिळाला. 'शरद पवार साहेब आगे बढो', 'रामकृष्ण हरी - वाजवा तुतारी', 'खासदार राजाभाऊ वाजे आगे बढो', 'उदय सांगळे आगे बढो' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. मतदारसंघातील हजारो मतदार, पदाधिकारी, कार्यकर्ते सभेसाठी उपस्थित होते.
लोकसभा निवडणूकीत जसा आशीर्वाद आपण महाविकास आघाडीला दिला, तशाच पध्दतीचा आशीर्वाद या विधानसभेच्या निवडणुकीत द्या आणि युवा नेतृत्व उदय सांगळे यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले. लोकसभेच्या निवडणुकीत मतदार बंधू-भगिनींनी यशाचा पाया रचला. विधानसभेत यशाचे शिखर गाठून दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले. मतदानाच्या बाबतीत अजिबात हयगय करु नका, पवार साहेबांचे हात बळकट करा, असेही ते म्हणाले.
लोकवर्गणीतून आमदार झालेले विद्यमान आमदार जनतेचा सेवक नव्हे तर आजमितीला जनतेचा मालक म्हणून काम करीत असल्याची खरमरीत टिका उदय सांगळे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यावर केली. कडवा पाणी योजना, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारक या पातळ्यांवर अपयशी ठरलेले कर्तृत्वहिन आमदार पूरचारी आणि नदीजोड प्रकल्पाचे श्रेय घेतात हा केविलवाणा प्रकार आहे. जातीसाठी नव्हे तर सिन्नर मतदारसंघाच्या मातीसाठी मी उमेदवारी करीत आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वात खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचे स्वप्न घेऊन सर्व जातीधर्माला सोबत घेऊन काम करीन, असा विश्वास देत सांगळे यांनी विजयी करण्याचे आवाहन केले.