मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात महायुती सरकारचा (Mahayuti Government) शपथविधी झाल्यानंतर आज शनिवारपासून विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होत आहे. नव्या आमदारांना या विशेष अधिवेशनात शपथ दिली जाणार आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे २८७ नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देतील. दरम्यान, विशेष अधिवेशनात विधान परिषद सभापतींची निवड होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे सभापतीपद मागील दोन वर्षांपासून रिक्त आहे. सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार असून त्याच दिवशी विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूक होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे (Maharashtra Legislative Council) सभापतीपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. नीलम गोऱ्हे सध्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. गोऱ्हे यांना विधान परिषदेचे सभापतीपद मिळाल्यास त्या राज्याच्या पहिल्या महिला विधान परिषदेच्या सभापती असतील. लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. त्यामुळे सभापती पदाचा मान हा एका महिलेला मिळण्याची शक्यता आहे.
शनिवार आणि रविवारी दोन दिवसांत आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर तिसर्या दिवशी सोमवारी विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडला जाईल. या पदासाठील अगोदर निवडणूक कार्यक्रम घोषित केला जाईल. विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर विधिमंडळाच्या संयुक्त बैठकीत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिभाषण होईल.