शिखर शिंगणापूर : कारखान्याच्या माध्यमातून हजारो तरुणांना प्रभाकर घार्गेंनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळवून दिला आहे. याउलट इथल्या लोकप्रतिनिधींनी कोणताच उद्योग उभा केला नाही. उलट ते लोकांवर प्रचंड दबाव टाकत आहेत. माणच्या आमदारांनी केवळ कंत्राटशाहीचा विकास केल्याचा आरोप खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केला.
शिखर शिंगणापूर (ता. माण) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घार्गेंच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप, मनोज पोळ, सुरेंद्र गुदगे, रणजितसिंह देशमुख, नंदकुमार मोरे, श्रीराम पाटील, अनिल पवार, तानाजी नरळे, एम. के. भोसले, तानाजी कट्टे, बापूराव काटकर, दादासाहेब मडके उपस्थित होते.
खा. मोहिते-पाटील म्हणाले, खटाव-माण तालुक्याला दिशा देणारे नेते म्हणून प्रभाकर घार्गेंकडे पाहिले जाते. त्यांच्या रुपाने चांगला उमेदवार महाविकास आघाडीला मिळाला आहे. या उलट तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी सहकाराचा अथवा खासगी असा कोणताच उद्योग निर्माण केला नाही. ते येथील लोकांवर प्रचंड दबाव टाकून खोट्या केसेस दाखल करत आहेत. मात्र कोणते पोलिस अधिकारी आता खोट्या केसेस दाखल करतात? ते मी बघून घेतो.
प्रभाकर घार्गे म्हणाले, तालुक्यात केवळ घोषणाबाजी करून दिशाभूल करण्याचे काम विद्यमान आमदारांनी केले. ते थांबवण्याची गरज आहे. माण-खटावमधील जनतेने कोणाच्याही दहशतीला बळी पडू नये. तालुक्यातील हुकूमशाही मोडीत काढण्याचे काम आम्ही सर्वजण करत आहोत. पैशातून सत्ता व सत्तेतून पुन्हा पैसा मिळवण्याचे काम लोकप्रतिनिधी करत आहेत. आपण राजकारणाबरोबर शेती, शैक्षणिक, उद्योग व व्यवसायात प्रगती केली आहे. त्यातून तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे.त्यात आणखी भर घालण्यासाठी माझे हात आणखी बळकट करा.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर सर्वांनी प्रभाकर घार्गेंचा ताकदीने खांद्याला खांदा लावून प्रचार करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रातील माण हा असा मतदारसंघ आहे, की जिथे सर्वजण एकत्र येऊन भाजपच्या उमेदवारचा पराभव करताना दिसत आहेत. त्यामुळे माण मतदारसंघात परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. ते दहिवडी (ता. माण) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.