सोलापूर : गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळे आहे. 180 ते 185 जागा जिंकून महायुतीचे सरकार सत्तेवर येईल, असा दावा भाजपचे निवडणूक प्रमुख रावसाहेब दानवे यांनी येथील पत्रकार परिषदेतून केला.
भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी बुधवारी (दि. 6) दानवे सोलापूर दौर्यावर होते. येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. यावेळी भाजपचे सोलापूर शहर उत्तरचे उमेदवार आ. विजयकुमार देशमुख, दक्षिण सोलापूरचे उमेदवार आ. सुभाष देशमुख, सोलापूर शहर मध्यचे देवेंद्र कोठे, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, शहाजी पवार उपस्थित होते.
दानवे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने जलयुक्त शिवार योजनेसारख्या अनेक योजना बंद केल्या. कोव्हिड काळामध्ये त्यांच्या चेल्याचपाट्यांना टेंडर दिली. त्यातून भ्रष्टाचार झाला. उद्धव ठाकरे हे निवडणूक काळात बाहेर पडतात आणि उद्योग बाहेर राज्यात चालले आहेत असे म्हणतात. ठाकरे यांनी आमच्या समोर येऊन टेबलावर बसून चर्चा करावी, अशा प्रकारची फेक नेरेटिव्ह पसरवून येणार्या उद्योगांना अडचणीत आणू नये, अशा शब्दात दानवे यांनी टीका केली.
महाविकास या बेगडी नावाचा मुखवटा घेऊन महाराष्ट्र भकास करणारे, वचननामा असे गोंडस नाव देत खोट्या आश्वासनांनी महाराष्ट्राची फसवणूक करणारे पुन्हा त्याच जुन्या फसव्या आश्वासनांची पोतडी घेऊन मैदानात उत्तरले आहेत. असे असले तरी विकासाला गती देणार्या महायुतीच्या विजयाचा झेंडा आता महाराष्ट्रावर फडकणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वासही दानवे यांनी केला. राज्यातील अडीच कोटी महिलांच्या संसाराला लाडकी बहीण योजनेमुळे हातभार लागला आहे, पण त्या योजनेविषयी खोट्या कंड्या पिकवून महिलांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा समाजविरोधी कट महाविकास आघाडीने शिजविला आहे.
भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात प्रचार करून त्यांना पराभूत केले. दादरमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निवडणूक रिंगणात असताना त्यांचा काँग्रेसने पराभव केला. दोनवेळा डॉ. आंबेडकर यांना संसदेमध्ये जाण्यापासून रोखले. काँग्रेस हे संविधान बदलाच्या चुकीच्या पद्धतीचा नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोपही यावेळी दानवे यांनी केला.