मुंबई : पुढारी वृत्तसेवा; महायुती सरकारचा महाशपथविधी (Maharashtra CM Oath Ceremony) सोहळा आज गुरुवारी आझाद मैदानावर होणार असला तरी या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचाच शपथविधी होणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे भाजप पक्षश्रेष्ठी, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षातील आमदारांच्या आग्रहानंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास राजी झाले आहेत. मात्र, खाते वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. हा तिढा सुटल्यानंतर आठ- दहा दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे.
महायुती सरकारचा शपथविधी आज सायंकाळी साडेपाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ते आता राज्याचे २१ वे मुख्यमंत्री असतील. तर अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात असतील की नाही हा संभ्रम दूर झाला आहे. शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे भाजपचा जीव भांड्यात पडला आहे.
दरम्यान, याच सोहळ्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रमुख मंत्र्यांचा शपथविधी होईल, अशी चर्चा होती. मात्र खाते वाटपाचा तिढा मिटला नसल्याने आज केवळ तिघांचाच शपथविधी होणार आहे. तर आज केवळ तिघांचा शपथविधी होईल. अन्य मंत्र्यांचा शपथविधी हा नागपूर अधिवेशनापूर्वी होईल.
एकनाथ शिंदे यांनी गृह खात्यावर केलेला दावा भाजपाला अमान्य आहे. त्यातच आता अजित पवारांना वित्त विभाग देण्यास शिवसेनेचा विरोध आहे. महत्वाच्या सर्व फायली वित्त विभागाकडे जातात. आता शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याने शिवसेना आमदारांना अजित पवारांकडून फायली अडविल्या जाण्याची भीती वाटत आहे. अजित पवारांना वित्त खाते देण्यापेक्षा हे खाते भाजपने स्वतःकडे ठेवावे, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.
मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रालयामध्ये येतील. त्यावेळी या तिघांची मंत्रिमंडळ बैठक पार पडेल. या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत देवाभाऊ लाडक्या बहिणींना आणखी एक खुशखबर देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लाडक्या बहिणींनी मतांचा वर्षाव केल्याने महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी योजना आणत त्यांना दरमहा दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात महायुतीने सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दीड हजार ऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. फडणवीस पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करून आपणच या लाडक्या बहिणींचे देवाभाऊ असल्याचे संकेत देणार आहेत.