पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत आज रविवारी (दि.१०) भाजपचे संकल्पपत्र (जाहीरनामा) प्रसिद्ध करण्यात आले. त्यातून लाडक्या बहिणींना २१०० रूपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, १० लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन, वृद्धांना २,१०० रुपये पेन्शन देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) भाजपने संकल्पपत्रातून २५ प्रमुख मुद्दे जनतेसमोर ठेवले आहे. केंद्र असो की राज्य, आम्ही जो संकल्प करतो; तो आमचे सरकार स्थापन झाल्यावर आम्ही पूर्ण करतो, असा विश्वास अमित शहा यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. ''आघाडीचा सर्व योजना सत्तेच्या लालसेपोटी आहेत. त्या विचारधारांचा अपमान आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला धोका देणाऱ्या आहेत.'' असा आरोप शहा यांनी केला. मला उद्धव ठाकरे (Amit Shah on Uddhav Thackeray) यांना विचारायचे आहे की, ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वीर सावरकर यांच्याबद्दल दोन शब्द बोलायला सांगू शकतात का? बाळासाहेब ठाकरे यांच्या सन्मानार्थ काँग्रेसचा कोणीही नेता दोन वाक्ये बोलू शकतो का?'' असा सवाल त्यांनी केला.
अंतर्गत विरोधादरम्यान आघाडीचे जे लोक सरकार स्थापन करण्याचे स्वप्न घेऊन निघाले आहेत; त्या लोकांना महाराष्ट्रातील जनतेने ओळखले तर बरे होईल, असेही अमित शहा म्हणाले.
आज येथे प्रसिद्ध करण्यात आलेले संकल्पपत्र हे महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. एक प्रकारे महाराष्ट्र अनेक युगांपासून प्रत्येक क्षेत्रात देशाचे नेतृत्व करत आहे. एक काळ असा होता जेव्हा ज्याची गरज होती, ती भक्ती चळवळही महाराष्ट्रातून सुरू झाली. गुलामीतून मुक्तीची चळवळही छत्रपती शिवाजी महाराजांनी इथूनच सुरू केली. सामाजिक क्रांतीचीही सुरुवातही महाराष्ट्रातून झाली. आमच्या संकल्पपत्रातून महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब दिसते, असे शहा यांनी नमूद केले.