पुढारी ऑनलाईन डेस्क : ऐन विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना यावेळी काँग्रेसने उमेदवारी नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार जयश्री जाधव यांची शिवसेनेच्या उपनेत्या पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी उद्योजक सत्यजित जाधव राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक आदी उपस्थित होते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून आमदार जयश्री जाधव यांचे पती चंद्रकांत जाधव काँग्रेसकडून विजय झाले होते. दरम्यान तीन वर्षापूर्वी चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले होते. त्यामुळे पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणले होते. दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. काँग्रेस उमेदवारांच्या अर्ज दाखल करतेवेळी त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. अखेर त्यांनी आज शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात जोरदार चढाओढ सुरू होती. महायुतीकडून राजेश क्षीरसागर, कृष्णराज महाडिक, सत्यजित कदम यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा होती; तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून आमदार जयश्री जाधव यांच्यासह शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, राजेश लाटकर यांची नावे आघाडीवर होती. काँग्रेसकडून मधुरिमाराजे किंवा माजी आमदार मालोजीराजे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढावे, असे काँग्रेसच्या नेत्यांचे मत होते. त्यासाठी त्यांच्यावर वरिष्ठ पातळीवरूनही प्रयत्न सुरू होते. परंतु घरात खासदार असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय मधुरिमाराजे व मालोजीराजे यांनी पक्षाला कळविला. तरीही त्यांच्यासाठी आग्रह सुरू होता. परंतु ते आपल्या मतावर ठाम राहिल्यामुळे काँग्रेसच्या वतीने माजी नगरसेवक राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. लाटकर यांना उमेदवारी जाहीर होताच पक्षांतर्गत विरोधाची लाट उसळली.