कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
राजकारणात काहीवेळा अशी परिस्थिती निर्माण होते की, त्यावेळी काही निर्णय घ्यावे लागतात. लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा सारासार विचार केला. उमेदवार सक्षम होता; परंतु निवडून येण्यासाठी अधिक सक्षम उमेदवार देता येईल काय, यासाठी आमचा प्रयत्न होता. म्हणून उमेदवारी बदलली. त्यामुळे ती चूक म्हणता येणार नाही किंवा दबावाने मी निर्णय बदलला, असेही म्हणता येणार नाही. महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकण्यासाठी हा निर्णय मीच घेतला आहे, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे व राहुल पाटील यांचे उमेदवारी अर्ज भरून आल्यानंतर आ. पाटील पत्रकारांशी बोलत होते.राजेश लाटकर यांच्या उमेदवारी बदलण्यावरून गेल्या दोन दिवसांमध्ये पक्षामध्ये अंतर्गत निर्माण झालेल्या परिस्थितीवर बोलताना आ. पाटील म्हणाले, कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर या सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसची उमेदवारी जाहीर केली होती. ही उमेदवारी आपण व माजी आमदार मालोजीराजे यांनीच निश्चित केली होती. परंतु, त्यांच्या उमेदवारीला विरोध झाल्यानंतर अनेक घटकांशी चर्चा केली आणि चर्चेतूनच मधुरिमाराजे यांची उमेदवारी जाहीर केली.
बुधवारी राजेश लाटकर यांची आपण तसेच खासदार शाहू महाराज, मालोजीराजे भेटून समजूत काढू. लाटकर भावासारखा आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा कार्यकर्ता असल्यामुळे ते आमच्यासोबत नक्की राहतील. त्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची ई वॉर्डमध्ये ताकद आहे. हे त्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मताधिक्य देऊन दाखवून दिले आहे. त्याची दखल घ्यावी लागेल. बेदखल करता येणार नाही. राजकारणात वेगवेगळ्या घटना घडत असतात. त्याचा विपर्यास करू नये. कार्यकर्त्यांनी जाहीररीत्या चर्चा करण्याऐवजी प्रथम मला जर खासगीत सांगितले असते, तर बरे झाले असते. सामोपचाराने मार्ग काढला असता, असेही आ. पाटील म्हणाले.