नागपूर : मुलींनो, माता पित्यानो मुलाला शिकवताना मुलीकडे दुर्लक्ष झाले असेल. पण आता काळजी करू नका मुलीचे मामा मंत्रालयात बसले आहेत. उच्च शिक्षणाचा खर्च राज्य सरकार देणार आहे, विरोधक थट्टा करत होते मात्र अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंत सर्व पैसे आम्ही जमा केलेले आहेत. लाडक्या बहिणींनो आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहे. तुमचे सावत्र भाऊ काँग्रेस वाले ही योजना कशी बंद होईल याचा प्रयत्न करीत आहेत. असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. शुक्रवारी पश्चिम, उत्तर आणि मध्य नागपुरात भाजप महायुतीच्या प्रचारार्थ त्यांनी तीन सभा घेतल्या.
फडणवीस म्हणाले, सावत्र भाऊ निवडून आले तर योजना बंद करतील, उद्धव ठाकरेंनी घोषणाच केली आहे, माझे सरकार आले की सरकारच्या योजना मी बंद करणार आहे. मात्र महाविकास आघाडीला मी सांगतो लाडक्या बहिणी तुम्हाला निवडून देणार नाही, त्या एकदा पुन्हा महायुतीलाच निवडून देणार आहेत. नितीन गडकरींच्या पायाभूत सुविधा, कामामुळे नागपूर शहर आंतरराष्ट्रीय शहरासारखे झाले आहे. नाईक तलाव भागातील लोकांना त्यांच्या जमिनीची मालकी मिळू शकेल असे कोणालाही वाटले नाही. मात्र हे आपण करून दाखवले. मार्चच्या अधिवेशनामध्ये तुमचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही असा शब्द दिला.
काँग्रेसने कधीतरी हलबा समाजाचा विचार केला का असा सवाल उपस्थित केला. गांधीबागेत चार एकर जागेवर पोलिस स्टेशन, पोलीस वसाहत, पार्किंगचा प्रश्न मार्गी लावणार आहे. इतवारीत जिथे जिथे जागा उपलब्ध आहे तिथे पार्किंगच्या सुविधा उभ्या केल्या जातील. प्रत्येक घटकाकरिता महायुती सरकारने काम केले. समाजातला कुठलाच वर्ग आपण वंचित ठेवला नाही. कामगारांच्या जीवनात परिवर्तन घडवायचे काम केले. मोदीजींनी बेटी बचाव बेटी पढाव पासून लखपती दीदी उपक्रम हाती घेतली, राज्यात एक कोटी महिला लखपती दीदी होतील. वर्षाला एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न कमवतील हा आमचा निर्धार आहे.
यावेळी आमदार विकास कुंभारे, अनिल अहिरकर, श्रीकांत शिवणकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, अर्चना डेहनकर, श्रीकांत आगलावे, सुरज गोजे, बंडू राऊत, गिरीश देशमुख, भास्कर पराते, राजेश कन्हेरे ,गिरधारी निमजे, किशोर उमरेडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.