सातारा : सातारा व जावलीतील जनतेने माझ्यावर विश्वास टाकून आमदारकीची संधी दिली. या संधीचे सोने केले. या जनतेसोबतची जुळलेली नाळ कधीच तुटणार नाही. जनतेच्या कायम ऋणात राहून मतदारसंघाचा विकास करणे हे माझे कर्तव्यच आहे. सातारा-जावलीतील जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच माझी ताकद असल्याचे प्रतिपादन सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.
सातारा तालुक्यात आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी गावभेट दौरा करत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. सातारा तसेच जावलीतील जनतेकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. गावागावांत आबालवृध्द आ. शिवेंद्रराजे भोसले यांना गराडा घालत असून सर्वत्र त्यांचे स्वागत होत आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून सर्वांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली जात आहे. स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या विचारांचा अवलंब करुन जनतेची सेवा केली असून जनसेवेत कधीही खंड पडणार नाही, असा शब्द आ. शिवेंद्रराजे यांनी लोकांना दिला.
जात-पात, गट-तट न मानता सर्वधर्म समभाव जपत सर्वांचेच प्रश्न सोडवले. जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होण्याचे मला भाग्य लाभले. सातारा-जावली हे माझे घर आणि हीच माझी कर्मभूमी आहे. जनतेच्या आपुलकी, प्रेम, जिव्हाळ आणि पाठिंब्याच्या जोरावर मतदारसंघात विकासगंगा प्रवाहित ठेवली आहे. यापुढेही मतदारसंघात विकासाचा झंझावात कायम सुरू राहील आणि विकासाच्या बाबतीत प्रत्येक गाव आदर्श करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करू, अशी ग्वाही आ. शिवेंद्रराजे यांनी यावेळी दिली.म
आ. शिवेंद्रराजे यांना आबालवृद्ध मनापासून शुभेच्छा देताना दिसत आहेत. सातारा तालुक्यातील वावदरे या गावात शिवेंद्रराजे गाडीतून जात असताना एका आजी आणि आजोबांच्या जोडप्याने हातांच्या बोटांचा इंग्रजी ‘व्ही’ करून हटके शुभेच्छा दिल्या. त्यामुळे शिवेंद्रराजे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास परळी खोर्याचे नेते राजू भोसले यांनी वावदरे येथील प्रचार बैठकीत व्यक्त केला.