हंजगी : दोन दिवसांपूर्वीच माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी काँग्रेसचे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांना पाठिंबा जाहीर केल्याचे वृत्त सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतानाच इकडे गेल्या विधानसभा निवडणुकीपासून कटूता निर्माण झालेले माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात मात्र आता मनोमिलन झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
राजकारणात कधीच कोणी कुणाचे शत्रू नसतो हे पुन्हा एकदा माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तनवडे आणि माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्याबाबत तालुक्यात घडताना दिसून येत आहे. यापूर्वीही आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्यात मनोमिलन घडवून आणण्यासाठी अनेक वेळा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून ही प्रयत्न करण्यात आले होते. मात्र त्याला म्हणावे तस यश आले नव्हते. आता ऐन विधानसभेच्या रणधुमाळीत या दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याने भाजपाच्या गोट्यात मात्र उत्साह पहायला मिळत आहे.
सध्या तालुक्यात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये रंगतदार पहायला मिळत आहे. दोन्ही आघाडीचे नेते व पदाधिकारी दररोज प्रचंड मेहनत घेताना दिसून येत आहेत.त्यातच आता तालुक्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांची आऊटगोईंग व इनकमिंग होत असताना पहायला मिळत आहे. वागदरी जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी हे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर येऊन कार्यकर्त्यांना आवाहन करत असल्याने वागदरी जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या कार्यकर्त्यांत मात्र उत्साहा संचारल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
आ. सचिन कल्याणशेट्टी आणि माझ्यात कधीच मतभेद नव्हते. काही किरकोळ राजकीय गोष्टींमुळे आमच्यात वितुष्टता निर्माण झाली होती.आता ही वितुष्टता आमच्या कार्यकर्त्यांमुळे पूर्णपणे दूर झाली आहे. यापुढे आम्ही भाजपात एक दिलाने काम करू.
-आनंद तानवडे, माजी जि. प. सदस्य