
धाराशिव : महाविकास आघाडीचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना लोकसभेत परंडा विधानसभा मतदारसंघातून मिळालेले 'लीड' हे आता महायुतीचे उमेदवार पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यातच महाविकास आघाडीतील टळलेली बंडखोरी व माजी आ. राहुल मोटे यांच्यामुळे सावंतांना व्यह्ररचनाही बदलावी लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री प्रा. सावंत यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या पाठिशी सर्व ताकद लावली होती. पाटील उमेदवारी अर्ज दाखल करताना सावंत यांनी या बहिणीसाठी मी छातीचा कोट करण्यास सदैव पुढे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी परंडा विधानसभा मतदारसंघातील त्यांची सर्व यंत्रणा कामाला लावली होती. त्या वेळी त्यांनी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर बोचरी टीकाही केली. प्रत्यक्षात मात्र परंडा विधानसभा मतदारसंघातून प्रा. सावंत हे महायुतीच्या उमेदवाराला लीड देण्यास कमी पडले.
प्रा. सावंत यांच्यासारखा मातब्बर नेता असल्याने परंड्यातून मोठे मताधिक्य मिळेल, अशी खात्री महायुतीच्या उमेदवार पाटील यांना होती. प्रत्यक्षात ८० हजारांपेक्षा अधिकचे मताधिक्य खा. राजेनिंबाळकरांना मिळाले. त्यानंतर पाच महिन्यांतच विधानसभा निवडणुका लागल्या आहेत.
महाविकास आघाडीकडून रणजित पाटील (ठाकरे शिवसेना) तसेच राहुल मोटे (राष्ट्रवादी शरद पवार) इच्छुक होते. दोघांनीही अर्ज दाखल केले होते. दोघेही निवडणूक लढविण्यावर ठाम होते. त्यामुळे महायुतीसाठी अर्थात सावंत यांना वाट सोपी झाली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मात्र पाटील यांनी अर्ज मागे घेतला. माजी आ. मोटे हे मातब्बर उमेदवार रिंगणात राहिल्याने प्रा. सावंत यांच्यासमोरील आव्हान वाढले आहे. महाविकास आघाडी एकदिलाने लढली तर प्रा. सावंत यांची विजय मिळविण्यासाठी दमछाक होणार, असे चित्र मतदारसंघात दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात प्रा. सावंत कोणती रणनीती आखतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.