कल्याण: पुढारी वृत्तसेवा: कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात महायुती व महाआघाडी मधील मित्र पक्षातील परस्पर हेवेदावे व बंडखोरी उफाळून आली आहे. भाजपचे शहराध्यक्ष वरूण पाटील यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी रोहित कुमार राठोड यांच्याकडे सादर केला.
यावेळी भाजपचे विभागीय सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, कोनगावच्या सरपंच रेखा पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजा सावंत, हेमंत परांजपे, सुधीर वायले आदी उपस्थित होते.
वरूण पाटील म्हणाले की, भाजपचे कार्यकर्ते व समाजसेवकांच्या आग्रहानुसार कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. कल्याण पश्चिम भागाचा नियोजनबद्ध विकास व प्रगतीसाठी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. नव्या विचारांच्या नेतृत्वाला कल्याणकरांनी पाठिंबा दिला आहे.