हिंगोली : पुढारी वृत्तसेवा : हिंगोली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बॅगांची आज (दि.१५) तपासणी करण्यात आली. शहा यांनी एक्सवर पोस्ट करीत याविषयी माहिती देत निकोप लोकशाहीसाठी निवडणूक आयोग करीत असलेल्या या तपासणीचे समर्थन केले आहे.
शहा यांची दुपारी हिंगोलीत सभा होती. या सभेसाठी त्यांचे हेलिकॉप्टर उतरल्यानंतर उपस्थित असलेल्या कर्मचार्यांनी बॅगा तपासल्या. त्यासंबंधीचा व्हिडिओ शहा यांच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. अलिकडेच उद्धव ठाकरे यांच्या बॅगा वणी, औसा येथे तपासल्यानंतर त्यांनी नाराजी नोंदविली होती. ठाकरे यांनी आयोग पक्षपातीपणे तपासणी करीत असल्याचा आरोप केला होता.
दरम्याच्या काळात मराठवाड्यात प्रचारासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी नेत्यांच्याही बॅगा तपासण्यात आल्या होत्या. जगात भारतामधील लोकशाही मजबूत करण्यासाठी नि:पक्ष निवडणुकांची गरज प्रतिपादित करून शहा यांनी निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे भाजप पालन करील, असे म्हटले आहे.