पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly polls) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ३८ उमेदवारांची पहिली यादी आज (दि.२३) जाहीर करण्यात आली. अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार आहेत. या यादीत धनंजय मुंडे (परळी), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), हसन मुश्रीफ (कागल), छगन भुजबळ (येवला), अदिती तटकरे (श्रीवर्धन), नरहरी झिरवळ (दिंडोरी), अनिल पाटील (अमळनेर) यांचा समावेश आहे. (NCP Candidate List) उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
३८ उमेदवारांच्या यादीत प्रस्थापित आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर सध्या मंत्री असणारे हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, अनिल पाटील, अदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, अजित पवारांनी आपल्याला बारामतीमधून निवडणूक लढवण्यास रस नाही, मी जो देईल त्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन बारामतीकरांना केले होते. परंतु बारामतीत अजित पवारांची गाडी अडवून त्यांनीच निवडणूक लढविण्याचा आग्रह केला होती. अखेर त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. आता त्यांच्या विरोधात शरद पवार गटातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्यास पवार घराण्यातच हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे.