पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीतील जागावाटप जवळपास निश्चित झाले असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दहापैकी सात जागा मिळालेल्या आहेत, तर भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेला प्रत्येकी एक जागा सोडल्याचे दिसत आहे. भोरच्या जागेवरून वाद सुरू आहे. (Maharashtra Assembly Polls)
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्या सर्व विद्यमान आमदारांना अधिकृत उमेदवारी देऊन टाकलेली आहे. आंबेगाव-शिरूर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, इंदापूरमधून माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जुन्नरमधून अतुल बेनके, खेड-आळंदीमधून दिलीप मोहिते-पाटील, मावळमधून सुनील शेळके, तर बारामतीतून अजित पवार यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. (Maharashtra Assembly Polls)
शिरूर मतदारसंघही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आला आहे; परंतु तेथील उमेदवाराची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते माऊली कटके यांनी सोमवारीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांना येथील उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. महायुतीतील पुरंदरची जागा ही शिवसेनेच्या शिंदे गटाला आहे, तेथून माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची उमेदवारी निश्चित असली, तरी अद्याप पक्षाने अधिकृतपणे कोणतेच उमेदवार जाहीर न केल्याने त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. भोरच्या जागेवरून मात्र महायुतीत मोठा तिढा आहे. भाजप आणि शिंदे यांची शिवसेना या जागेसाठी हक्क सांगत आहे. (Maharashtra Assembly Polls)