Amol Mitkari Vs Laxman Hake Political Controversy
मुंबई : महाराष्ट्राचे राजकीय वातावरण सध्या अमोल मिटकरी विरुद्ध लक्ष्मण हाके यांच्यातील वाकयुद्धामुळे तापले आहे. विंचू चावला तर त्याचा मुका घ्यायचा नसतो, त्याची नांगी ठेचायची असते अशा तिखट शब्दात अमोल मिटकरींनी लक्ष्मण हाकेंवर निशाणा साधला आहे. तर या टीकेला लक्ष्मण हाकेंनेही प्रत्युत्तर दिले आहे. अमोल मिटकरी फुटकळ माणूस असल्याचं प्रत्युत्तर हाकेंनी दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते- आमदार अमोल मिटकरी आणि ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. शनिवारी अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा लक्ष्मण हाकेंवर निशाणा साधला. अमोल मिटकरी X (आधीचे ट्विटर) पोस्टमध्ये म्हणतात, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर विकृत लोकांकडून आरोप केला जातोय. झाकणझुल्याच्या माहितीसाठी. सोबत अमोल मिटकरींनी राज्य सरकारतर्फे विविध महामंडळांना दिलेला निधी याची आकडेवारीच पोस्ट केली आहे.
अकोला येथे पत्रकारांशी संवाद साधताना अमोल मिटकरी म्हणाले, यावर (महामंडळांचा निधी) कोणाला शंका असेल तर त्यांनी मंत्रालयात जाऊन संपर्क करावा.
लक्ष्मण हाके यांचं नाव न घेता पुढे बोलताना म्हणाले, ज्याला अक्कल नसेल त्याला आमच्या भाषेत उत्तर द्यायलाही आम्ही तयार आहोत. जर तुम्हाला विंचू चावला तर त्याचा मुका घ्यायचा नसतो. त्याची नांगी ठेचायची असते. आज एकादशी असल्याने मला वाद -विवाद करायचा नाही.
अमोल मिटकरींच्या टीकेबाबत पुण्यातील पत्रकारांनी विचारले असता लक्ष्मण हाके म्हणाले, मला झाकणझुल्या म्हटलं, शिव्या दिल्या तरी मला फरक पडणार नाही. महामंडळांच्या आकडेवारीबाबत अजित पवार यांनी उत्तर दिलं पाहिजे. अमोल मिटकरी हा फुटकळ माणूस आहे. त्याने आम्हाला फुटकळ आकडेवारी देऊ नये. सारथीला जो निधी दिला जातो तेवढा निधी महाज्योतीला दिला जात नाही असा आमचा आरोप आहे.
अजित पवार हे कधी भाजपासोबत तर कधी उद्धव ठाकरेंसोबत सत्तेत असतात. त्यामुळे आम्हाला अजित पवारांनी शिकवू नये. पवार कुटुंबीय हा सहकार क्षेत्राला लागलेला रोग आहे, अशी बोचरी टीका लक्ष्मण हाकेंनी केली. आमच्याकडे शब्दांचे भांडार आहे, कॅमेऱ्यासमोर आक्षेपार्ह शब्द वापरणाऱ्या प्रवक्त्याला अजित पवार भर घालत आहेत, असंही त्यांनी सांगितले.