Amol Mitkari and Rupali Patil Thombare Pudhari
महाराष्ट्र

Ajit Pawar: अजित पवारांचा मोठा निर्णय! रुपाली पाटील ठोंबरे आणि अमोल मिटकरींची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी

Amol Mitkari and Rupali Patil Thombare News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने मोठा निर्णय घेत रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरी यांना प्रवक्तेपदावरून हटवलं आहे. ठोंबरे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

Rahul Shelke

Amol Mitkari and Rupali Patil Thombare Spokespersons: राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) पक्षात शिस्त आणि समन्वय राखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या दोन प्रमुख प्रवक्त्यांना, रुपाली पाटील ठोंबरे आणि अमोल मिटकरी यांना त्यांच्या पदावरून मुक्त करण्यात आलं आहे. पक्षाने नव्या 17 प्रवक्त्यांची यादी जाहीर केली असून, त्यात या दोघांची नावे दिसत नाहीत.

रुपाली ठोंबरे यांच्यावर पक्षाची कारवाई

रुपाली पाटील ठोंबरे यांना हटवण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी पक्षाच्या महिला नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सातत्याने केलेली टीका.
फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणात ठोंबरे यांनी महिला आयोगावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. त्यावरून त्यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि पुण्यात आंदोलनही केलं होतं.

या भूमिकेला पक्षाने शिस्तभंग मानून ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
मात्र, नोटिशीनंतरही त्यांनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली, ज्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे. शेवटी पक्षाने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना प्रवक्तेपदावरून हटवलं.

अमोल मिटकरी यांनाही दिला नारळ

प्रवक्तेपदावरून हटवण्यात आलेलं दुसर नाव म्हणजे अमोल मिटकरी, जे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषद सदस्य आहेत. त्यांच्याबाबत अधिकृत कारण स्पष्ट झालेलं नसलं तरी, गेल्या काही दिवसांतील त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात आली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळेच नव्या यादीत मिटकरी यांना स्थान देण्यात आलं नाही.

नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर

अजित पवार गटाने जाहीर केलेल्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीत हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे यांच्यासह आणखी 15 नवी नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामध्ये अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सायली दळवी, रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत पवार, शशिकांत तरंगे, ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, सुरज चव्हाण, विकास पासलकर व श्याम सनेर यांचा समावेश आहे. तर कार्यालयीन चिटणीस पदी संजय तटकरे यांची नियुक्ती करत जुन्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT